कोयना जंगलातील कॅमेरा ट्रॅपमध्ये STR T6 हिरकणी पुन्हा कैद
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील STR T6 ‘हिरकणी’ वाघीण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची चर्चा सुरू होती. तिच्या गळ्यात बसवण्यात आलेल्या सॅटेलाईट GPS कॉलरमधून सलग दहा दिवस एकाच ठिकाणाहून सिग्नल मिळत असल्याने वनविभाग सतर्क झाला होता. मोठ्या प्रमाणावर गस्त वाढवून जंगल परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र कॉलर असूनही हिरकणीचा ठावठिकाणा लागत नसल्याने कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा कॉलर गळून पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
कॉलर नसली तरी हिरकणीची प्रकृती ठणठणीत
वनविभागाने वाढीव ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने जंगलातील हालचालींचे विश्लेषण सुरू केले असता, कोयना जंगलातील कोअर भागात एका वाघिणीचे दर्शन झाले. तिच्या अंगावरील पट्ट्यांचे विश्लेषण केल्यानंतर ती STR T6 हिरकणीच असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे तिच्या गळ्यात GPS कॉलर दिसून आली नाही. वनअधिकाऱ्यांच्या मते हिरकणीने स्वतःच्या पंज्याने कॉलर काढून टाकली असावी किंवा ती नैसर्गिकरित्या गळून पडली असावी. दरम्यान, कॉलर अधूनमधून सिग्नल देत असल्याचेही समोर आले आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटो व व्हिडिओंमधून हिरकणीची प्रकृती सुदृढ असल्याचे दिसून येत असून तिचे वजनही वाढल्याचे प्रथमदर्शनी जाणवत आहे.
७ फेब्रुवारी २०२६ रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना कोअर भागात हिरकणी वाघिणीस निसर्गमुक्त करण्यात आले होते. तसेच झाडांच्या खोडांवर मूत्र फवारून आपली हद्द निश्चित करण्याच्या खुणाही आढळून आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.













