दिवा–चिपळूण मेमूचा विस्तार करून दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू करण्याची मागणी

संगमेश्वर( प्रतिनिधी ):दिवा वरून गणपती तसेच इतर सणांच्या काळात स्पेशल ट्रेन म्हणून धावणाऱ्या दिवा–चिपळूण मेमू गाडीचा विस्तार करून ती दिवा–संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुपच्या वतीने कोकण रेल्वेकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, सदर गाडी भविष्यात दिवा–संगमेश्वर मार्गावर सुरू झाल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कडवई तसेच आसपासच्या परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः सणासुदीच्या काळात गावी ये-जा करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा प्रवाशांना अत्यंत गर्दीत व कसरत करून प्रवास करावा लागतो. तसेच या भागातील अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबई व उपनगरांकडे नियमित प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर मेमू सेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे.
सणासुदीच्या काळात तसेच नियमित दिवसांमध्ये या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असल्याने या गाडीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हिताचा विचार करून दिवा–संगमेश्वर मेमू सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.