हॉटेलचा रूम पहाण्याच्या बहाण्याने आले आणि रजिस्टर लांबविले
पोलीसांकडून सतर्कतेचे आवाहन; पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून तपास सुरू
- राजापूर (प्रतिनिधी): गत सप्ताहात गुरूवारी आठवडा बाजाराच्याच दिवशी शहर व परिसरात तीन ते चार संशयीत महिला फिरत असल्याची घटना घडलेली असतानाच सोमवारी शहरानजीकच्या कोदवली साईनगर पुर्नवसन वसाहतीतील हॉटेल फुडलँन्ड मध्ये चार अज्ञात इसमांनी प्रवेश करत रूम पहाण्याच्या बहाण्याखाली हॉटेलचे ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. हे संशयीत हॉटेल फुडलॅन्ड बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
या घटनेनंतर हॉटेल मालक व राजापूर नगर परिषदेचे आरोग्य सभापती सुलतान ठाकूर यांनी तात्काळ राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांची भेट घेऊन घडल्या प्रकाराची माहिती देत तक्रारही दिली आहे.
या प्रकारानंतर पोलीसांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर प्रसिध्द करत नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. हे चारही संशयीत तरूण म्हणजे २७ ते ३२ वयोगटातील आहेत.
कोदवली साईनगर पुर्नवसन वसाहतीत हॉटेल फुडलँन्ड हॉटेल आहे. या ठिकाणी रहाण्याची सोय आहे. सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता दोन इसम हॉटेल मध्ये आले. त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला रूम आहे का अशी विचारणा केली, त्याने आहे असे सांगितले, त्यानंतर त्यांनी रूम दाखविण्याची मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यासोबत त्यातील एक इसम रूम पहाण्यासाठी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गेला. यावेळी त्याचा एक साथीदार खाली उभा होता तर अन्य दोघेजण हॉटेलच्या बाहेर घुटमळत होते. त्यानंतर तो इसम रूम पाहून हॉटेल कर्मचाऱ्यासोबत खाली आला व त्याने रूम नको असे सांगितले. व ते हॉटेल बाहेर पडले.
दरम्यान या कर्मचाऱ्याला हॉटेलच्या काऊंटरवरील ग्राहक नोंदणी रजिस्टर टेबलावर नसल्याचे दिसून आले, त्याने हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता सदरचे रजिस्टर हे रूम पहाण्यासाठी आलेल्या त्या इसमासोबत हॉटेल मध्ये आलेल्या व खाली थांबलेल्या एका इसमाने उचलुन आपल्या बॅगेत टाकल्याचे दिसून आले.
यानंतर तात्काळ त्या हॉटेल कर्मचाऱ्ऱ्याने ही बाब मालक सुलतान ठाकुर यांना सांगितली. ठाकूर यांनी तात्काळ हॉटेलकडे धाव घेत सीसीटीव्ही तपासले व याबाबत पोलीसांना माहिती दिली. ते मराठी बोलत होते व हॉटेल मधून बाहेर पडल्यानंतर ते हायवेने पेट्रोलपंपाच्या दिशेने चालत गेल्याचे दिसून येत आहे.
या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीसांनीही सोशल मिडियावर सदचे फुटेज टाकून सतर्कतेचे आवाहन केले आहे. दरम्यान अशा प्रकारे हे चार संशीयत आढळून आल्याने हे नक्की कोण, कुठुन आले, हॉटेलचे नोंदणी रजिस्टर त्यांनी का चोरून नेले असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकाराची दखल घेत पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तपासाची चक्रे फिरवली असून या संशयीतांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.













