रत्नागिरी ः प्रतिनिधी
कोर्ट कमिशनरव्दारे सीलबंद केलेल्या मालमत्तेमधील घरात बेकायदेशिरपणे प्रवेश केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 मार्च रोजी दुपारी 2.30 ते 7 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6.15 वा.कालावधीत पावस येथे घडली आहे.
दिनेश भरत बाणे (40),भरत महादेव बाणे(69) आणि एक महिला (65,सर्व रा.पावस,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात लक्ष्मण गणू म्हात्रे (56,रा.धोपेश्वर घाटी,राजापूर) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, यातील दिनेश बाणे याने राजापूर अर्बन को.ऑप.बँकेकडून 2 लाखांचे कर्ज घेताना पावस येथील आपले घर व जमिन तारण ठेवले होते. परंतू त्याने बँकेच्या कर्जाची रक्कम भरणा न केल्याने बँकेने मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात ताबा मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, मुख्य न्यायदंडाधिकारी रत्नागिरी यांनी या दाव्यांमध्ये नेमलेल्या कोर्ट कमिशनरने पोलिस संरक्षणात त्या मिळकतीचा ताबा घेत संशयितांच्या समक्ष सीलबंद केल होते.
परंतू, संशयितांनी घराचा दर्शनी दरवाजा सीलबंद केलेले कुलूप तोडून दरवाजा जवळ असलेली खिडकी उघडी केली आहे. तसेच घराच्या मागील बाजूस लागून असलेल्या शौचालय आणि बाथरुमचे सीलबंद केलेले कुलुप तोडून नाहिसे केले आहे.घराच्या मागील बाज्ास भांडी आणि दर्शनी बाजुला अंगणात कपडे वाळत घालून अतिक्रमण केले आहे.













