वालोपे येथे भीषण अपघात; कार ३० फूट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

पाच जखमींमध्ये दोन बालकांचा समावेश

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे भीषण अपघात घडला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये दोन लहान बालकांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि. २० मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.२५ वाजण्याच्या सुमारास कार क्रमांक MH 08 BE 1742 ही मुंबईहून चिपळूणच्या दिशेने येत होती. वालोपे येथील एचपी पंपासमोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या खोल दरीत जाऊन कोसळली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.


घटनेची माहिती मिळताच चिपळूण येथील गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थेची २४ तास अपघात सेवा रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

या अपघातात संजय जाधव (रा. मार्कंडी) यांचा मृत्यू झाला असून मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी कामथे सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला.

अपघातातील जखमींमध्ये अप्रिन सावंत (वय ४४, मुंबई), रीधा मोडक (वय २८, मुंबई), उजेर मुल्ला (वय ९, चिपळूण), रिया मुल्ला (वय ३६, चिपळूण) आणि आईल मुल्ला (वय ४, चिपळूण) यांचा समावेश आहे. जखमी दोन्ही बालकांसह सर्वांवर सध्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्ग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.