खेड (प्रतिनिधी) : जागतिक स्तरावर रासायनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगामध्ये वेगाने होत असलेले बदल, ‘इंडस्ट्री ४.०’चे वाढते महत्त्व आणि शाश्वत विकासाची गरज लक्षात घेता घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT) येथील केमिकल इंजिनीअरिंग विभाग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअर्स (IIChE), मुंबई रिजनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रज्वलन २०२६’ हे एकदिवसीय राष्ट्रीय तांत्रिक संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या संमेलनाने कोकणातील तांत्रिक शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि उद्योगाभिमुख कौशल्यांची जाणीव अधिक दृढ केली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विनाती ऑर्गेनिक्स, लोटे येथील सहाय्यक उपाध्यक्ष प्रवीण गव्हाळ उपस्थित होते. संमेलनाचे समन्वयक डॉ. एस. जे. कुलकर्णी आणि डॉ. एस. पी. जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन प्रभावीपणे सांभाळले, तर आयोजन सचिव डॉ. एस. डी. डोके यांनी संपूर्ण आयोजनाची धुरा यशस्वीपणे पेलली.
प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण होणे आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांचे आकलन असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर प्रमुख पाहुणे प्रवीण गव्हाळ यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाची जोड मिळाल्यासच एक सक्षम आणि यशस्वी अभियंता घडतो, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
संमेलनातील मुख्य आकर्षण ठरले ते ‘उद्योगांसाठी पदवीधर विद्यार्थ्यांची सज्जता भाग – २’ या विषयावरील परिसंवाद. या चर्चासत्रात उद्योग क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी सध्याच्या शिक्षण पद्धती व उद्योगांच्या अपेक्षा यातील अंतर कमी करण्यासाठी आवश्यक उपायांवर सखोल चर्चा केली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा सायन्सचा केमिकल इंजिनीअरिंगमधील वाढता वापर, सिम्युलेशन टूल्सचे महत्त्व, शाश्वत विकास आणि ग्रीन तंत्रज्ञान, तसेच औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व या विषयांवर विशेष भर देण्यात आला.
‘प्रज्वलन २०२६’ या संमेलनामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांची प्रत्यक्ष माहिती मिळाली असून भविष्यातील तांत्रिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.













