त्या विद्यार्थ्याचे सात पेपर दुसऱ्याने लिहील्याचा धक्कादायक प्रकार उघड

दहावी परीक्षा गैरप्रकारामुळे वैभववाडी तालुका हादरला

कोकण बोर्डाने त्या विद्यार्थ्याचा निकाल थांबावीला : चौकशी सूरू

स्वतः च्या मुलाला पास करण्यासाठी शिक्षक पित्याचा प्रताप

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान घडलेल्या गंभीर गैरप्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याच्या नऊ विषयांच्या पेपरपैकी तब्बल सात विषयांच्या उत्तरपत्रिका अन्य व्यक्तीकडून लिहून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्याच्या शिक्षक असलेल्या वडिलांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली असून, स्वतःच्या मुलाला उत्तीर्ण करण्यासाठी दुसऱ्या शिक्षकाकडून पेपर लिहून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे तालुक्याच्या शैक्षणिक प्रतिमेलाच धक्का बसला असून कोकण विभागीय बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. संबंधित विद्यार्थ्याचा निकालही सध्या राखून ठेवण्यात आला आहे.
मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान एका ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रात हा प्रकार घडल्याचे उघड झाले. परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एका शिक्षकांकडे गेली असता मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षरात स्पष्ट फरक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ याबाबत कोकण विभागीय बोर्डाकडे तक्रार केली.

त्यानंतर बोर्डाने संबंधित विद्यार्थ्याचे सर्व नऊ विषयांचे पेपर मागवून तपासणी केली. या तपासणीत सात विषयांच्या मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिकांमधील हस्ताक्षर पूर्णपणे वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर बोर्डाने केंद्र संचालक तसेच केंद्रावर कार्यरत संबंधित शिक्षकांना रत्नागिरी येथे बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
दरम्यान, संबंधित विद्यार्थ्याचा निकाल बोर्डाने राखून ठेवला असून त्याला ‘रस्टिकेट’ करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. चौकशीत संबंधित विद्यार्थ्याचे वडील स्वतः एका माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असून मुलाला सेमी इंग्रजी शिक्षणासाठी दुसऱ्या विद्यालयात प्रवेश दिला होता.

कोकण विभागीय बोर्डाकडून कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवले जाते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा होत असताना संबंधित विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका वर्गाबाहेर कशा गेल्या आणि पुन्हा लिहून मुख्य उत्तरपत्रिकेला कशा जोडल्या गेल्या, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हा प्रकार केवळ एका विषयापुरता मर्यादित नसून सात विषयांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाल्याने या गैरप्रकारात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालुक्यात कॉपी पुरवणारे रॅकेट कार्यरत असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कोकण विभागीय बोर्डात गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल राहिला आहे. त्यात वैभववाडी तालुका हा विशेषतः गुणवत्तापूर्ण निकालासाठी ओळखला जातो. मात्र या घटनेमुळे तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.