सेवा त्वरित सुरू न केल्यास सावंतवाडी कार्यालयावर धडक देणार
उपसरपंच सुशील कामतेकर यांचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील बीएसएनएल टॉवर गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने गावात तीव्र नेटवर्क समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात वारंवार बीएसएनएलच्या अधिकारी वर्गाचे लक्ष वेधूनही सेवा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत. सदरची सेवा तात्काळ सुरू न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयावर धडक द्यावी लागेल, असा तीव्र इशारा आजगावचे उपसरपंच सुशील कामतेकर यांनी दिला आहे.
तालुक्यातील आजगाव गावासाठी एकमेव बीएसएनएलची नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. मात्र, येथील बीएसएनएलचा टॉवर नेहमीच अधूनमधून बंद पडत असल्याने नेटवर्कअभावी ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असतात. सद्यस्थितीत गेल्या १५ दिवसांपासून हा टॉवर पूर्णपणे बंद आहे. या संदर्भात उपसरपंच श्री. कामतेकर यांनी वारंवार सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात हेलपाटे मारून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, परंतु अद्याप सेवा सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत.
नेटवर्क नसल्यामुळे गावातील अनेक महत्त्वाची कामे रेंगाळली आहेत. शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, विविध शासकीय कामे व बँकिंग व्यवहारही ठप्प झाले आहेत. गावातील ग्रामस्थांना साध्या फोन कॉलसाठी आणि इंटरनेट वापरासाठी नेटवर्कच्या शोधात गावाबाहेर धाव घ्यावी लागत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांची होणारी ही मोठी गैरसोय लक्षात घेता, संबंधित यंत्रणेने आजगाव येथील बीएसएनएलचे नेटवर्क तात्काळ सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा संतप्त ग्रामस्थांना सोबत घेऊन सावंतवाडी येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उपसरपंच सुशील कामतेकर यांनी दिला आहे. यामुळे आता बीएसएनएल प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.












