रत्नागिरी-सिंधुदुर्गातील दुर्गम गावांचा नेटवर्क प्रश्न सुटणार

तालुकानिहाय नवीन सर्वेक्षण व ‘कनेक्टिव्हिटी दरबार’चे मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

​सिंधुदुर्ग :
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील दुर्गम व डोंगराळ भागातील मोबाईल नेटवर्कच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही जिल्ह्यांतील नेटवर्कविहीन गावांना प्राधान्याने मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी जिल्हाधिकारी, भारत संचार निगम (BSNL) चे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून तालुकानिहाय नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले आहेत.

​या सर्वेक्षणाच्या आधारे एक ठोस कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार केला जाणार असून, त्याद्वारे नेटवर्क नसलेल्या गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर विशेष भर दिला जाईल. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येचे जागेवरच निवारण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात “कनेक्टिव्हिटी दरबार” आयोजित करण्याची अभिनव संकल्पना मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी मांडली. या दरबारामध्ये बीएसएनएलचे अधिकारी, स्थानिक आमदार, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि नागरिक प्रत्यक्ष एकत्र येऊन नेटवर्कच्या समस्यांची नोंद करतील, ज्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

​बैठकीदरम्यान मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, कोणती गावे सॅच्युरेशन प्रकल्पात समाविष्ट करणे आवश्यक आहे, कोणत्या दुर्गम ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर उभारण्याची गरज आहे आणि ही सर्व कामे किती कालावधीत पूर्ण केली जातील, याचा तालुकानिहाय सविस्तर रोडमॅप तातडीने तयार करण्यात यावा.

​या महत्त्वपूर्ण बैठकीला चिपळूणचे आमदार शेखर निकम, महाआयटीच्या संचालक श्रीमती भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, विभागाचे अवर सचिव योगेश गोसावी उपस्थित होते.

तर दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) भाजप पदाधिकारी अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नांदोसचे सरपंच विजय निकम यांच्यासह संबंधित निवासी जिल्हाधिकारी आणि भारत संचार निगमचे अधिकारी अमित पाटील सहभागी झाले होते. या निर्णयामुळे कोकणातील दुर्गम आणि डोंगराळ गावांमधील डिजिटल कनेक्टिव्हिटीला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.