सावंतवाडीत शांतता समितीच्या बैठकीत नागरी समस्यांवर वादळ

वीज खंडित आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून सदस्यांची नाराजी

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरामध्ये सर्व धर्मीय नागरिक सण-उत्सव नेहमीच गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरे करतात, अशी येथील परंपरा आहे. मात्र, सध्या शहरात सुरू असलेल्या विजेच्या तीव्र लपंडावामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. ऐन सणासुदीच्या काळात या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याला सर्वस्वी वीज वितरण कंपनीच जबाबदार राहील, असा इशारा शांतता समितीच्या सदस्यांनी बैठकीत दिला.

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील विविध नागरी समस्यांवरून जोरदार चर्चा झाली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. नकुल पार्सेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, ऑगोस्तीन फर्नांडिस, पोलीस हवालदार अमित राऊळ आदी उपस्थित होते.
​ बैठकीत शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील वीज समस्येकडे पोलीस प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधले. सध्या कोणताही विजांचा कडकडाट किंवा मुसळधार पाऊस नसतानाही, सकाळपासून वारंवार वीज खंडित केली जात आहे. यामुळे जनतेमध्ये तीव्र उद्रेक असून, सणासुदीच्या काळात शांतता भंग होऊ नये यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पूर्वानुभव लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या गंभीर परिस्थितीबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवून सतर्क करावे, अशी विनंती पोलीस निरीक्षकांना करण्यात आली.

​ याशिवाय, शहरातील इतर प्रमुख समस्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शहरात मोकाट कुत्रे आणि गुरांचा वावर कमालीचा वाढल्याने पादचारी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच पर्यटन हंगाम सुरू असल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गवळीतिठा, जयप्रकाश चौक, गांधी चौक आणि मुख्य बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी होत आहे. नगरपरिषदेसमोरील बसस्थानक परिसरात वाहने अस्ताव्यस्त उभी राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन वाहतूक व्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.

​बेकायदेशीर जाहिरात फलक हटवण्याची मागणी
शहरातील चिटणीसनाका येथील मोती तलावाच्या सांडव्याजवळ लावले जाणारे जाहिरात फलक न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून तातडीने हटवण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी उपस्थित करण्यात आली.

​संबंधित विभागांशी समन्वय साधून कारवाई करू : पोलीस निरीक्षक
बैठकीचा समारोप करताना प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सावंतवाडीतील सर्व धर्मीय बांधव नेहमीच सलोख्याने आणि शांततेत सण साजरे करतात, या गौरवशाली परंपरेचे कौतुक केले. तसेच शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या वीज, वाहतूक कोंडी, मोकाट जनावरे आणि अन्य समस्यांबाबत संबंधित शासकीय विभागांशी तातडीने समन्वय साधून योग्य ती सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.