कणकवली : महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर यशस्वीरीत्या सर करत कलमठ बाजारपेठ शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी शोभित कासले याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘महाराष्ट्राचे एव्हरेस्ट’ म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे १६४६ मीटर उंचीवर असून ते अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे.
दि. २४ व २५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या ट्रेकमध्ये शोभित कासले सहभागी झाला होता. कमी वयात एवढे कठीण शिखर सर करण्याची त्याची जिद्द आणि धाडस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वीही शोभितने पावनखिंड ते विशालगड अशी कठीण पदभ्रमंती यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, ट्रेकिंगची त्याला विशेष आवड असल्याचे दिसून येते.
या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण पाच जण सहभागी झाले होते. शोभितच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक तसेच विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत असून, भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












