दापोली BREAKING: साखळोली अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

देवाचा खळगा वळण पुन्हा ठरले धोकादायक

दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर बुधवारी (दि. २० मे) इको वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे फणसू परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे (दोघेही रा. फणसू) हे दुचाकीवरून दापोलीहून फणसूच्या दिशेने जात होते. दरम्यान, देवाचा खळगा परिसरातील तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या इको वाहनासोबत त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की या अपघातात शुभम फडकले हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. शुभम फडकले याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येत होते. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे फणसू गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, देवाचा खळगा परिसरातील हे वळण अत्यंत धोकादायक मानले जात असून येथे वारंवार अपघात घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, चेतावणी फलक, रस्त्याचे मजबुतीकरण आणि वेग नियंत्रणाची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.