सभापती सिद्धेश रावराणे यांनी गट शिक्षण अधिकारी श्री वडर यांना धरले धारेवर
दोषी शिक्षकांना निलंबित करा : शिक्षकांच्या संघटना मोढून काढा
वैभववाडी पं. स. च्या सभेत सदस्य आक्रमक
वैभववाडी प्रतिनिधी :
दहावी परीक्षेतील गैरप्रकारमुळे वैभववाडी तालुक्याची बदनामी झाली आहे. गुणवतेत सर्वात पुढे असलेल्या तालुक्याच्या गुणवत्तेला डाग लागला आहे. त्यामुळे या प्रकारणातील मोटेगावकर कोण? त्याचे नाव पुढे आले पाहिजे. झालेल्या बदनामी ला शिक्षण विभाग जबाबदार आहे. असे खडे बोल सभापती सिद्धेश रावराणे यांनी गटशिक्षणाधिकारी अशोक वडर यांना सुनावत धारेवर धरले. प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषीवर गुन्हे दाखल करा. तसेच शिक्षकांच्या संघटना मोडीत काढा. अशी मागणीही सदस्यांनी केली.
वैभववाडी पंचायत समिती मासिक सभा सभापती सिद्देश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली विरशिरोमनी महाराणा प्रतापसिह सभागृहात पार पडली. यावेळी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर झालेल्या कॉफी प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. या चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
दहावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. त्याचे पडसाद आज झालेल्या वैभववाडी पंचायत समितीचे मासिक सभेत उमटले.
याबाबत सदस्यांनी गटशिक्षण अधिकारी श्री वडर यांच्याकडे या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली. तसेच तालुक्यात एवढी मोठी घटना घडत असतांना आपल्याला याबाबत काहीच माहिती नाही. हे योग्य नाही असे सभापती रावराणे यांनी सुनावले. यावर बोलतांना वडर म्हणाले, याबाबत आपल्याला दोन दिवसापूर्वी माहिती मिळाली आहे. याबाबत बोर्डाने परस्पर बोर्डाने परस्पर संबंधित केंद्रावरील शिक्षकांना चौकशीसाठी बोलावून त्यांची चौकशी केली आहे असे सांगितले.
तालुक्यात बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटर बाबत चर्चा करताना सभापती म्हणाल, स्मार्ट मीटर बसवण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून घाई करण्यात आली. मात्र त्यातील त्रुटी दूर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यावेळी एकमेकांकडे बोटे दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवून तुम्ही लोकांना त्रास देत आहे. संबंधित ग्राहकांना वेळेवर वीज बिल येत नाहीत. त्यामुळे वीज बिल भरायला विलंब होत आहे. आणि विलंब झाल्यानंतर आपल्याकडून तात्काळ वीज पुरवठा खंडित केला जात आहे. हे अत्यंत गंभीर आहे. वैभववाडी तालुक्यातील बहुतांश घरांमध्ये वयोवृद्ध व्यक्ती राहत आहेत. त्यांना ऑनलाईन मेसेज समजत नाही. काही भागात नेटवर्क प्रॉब्लेम आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना वेळेत बिल मिळाले पाहिजे. यापुढे जर असा वीज पुरवठा खंडित केला तर आम्ही तुमच्या दारात येणार हे लक्षात ठेवा असा इशारा सभापती रावराणे यांनी वीज वितरणचे अभियंता श्री चव्हाण यांना दिला आहे.
वैभववाडी तालुक्यातील एसटी बस अनियमित धावत असून त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. सभागृहात बोलूनही प्रश्न सुटणार नसतील तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा देवानंद पालांडे यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
गरोदर मातांची सोनोग्राफी ही ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथेच झाली पाहिजे. सोनोग्राफीसाठी गरोदर मातांना कणकवली येथे जावे लागत आहे. त्यामुळे या मातांची दिवसभर परवड होत आहे. तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुद्धा ग्रामीण रुग्णालयात पार पडण्याची मागणी पालांडे यांनी यावेळी केली.
पावसाळा तोंडावर आला असून फोंडा वैभववाडी उंबर्डे मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्यात याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. या अगोदर खड्डे बुजवण्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे आता डांबराने खड्डे भरा अन्यथा काम करू देणार नाही. आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नका असे खडे बोल सदस्य मंगेश लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
तरळे – वैभववाडी राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटक नजीक सुरू असलेले रस्त्याचे काम थांबून त्या ठिकाणी पावसाळ्यात वाहतूक सुरळीत सुरू राहण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सभापती रावराणे यांनी केली.













