चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे साहिल पांचाळ यांनी पदभार स्वीकारला

एकमेव उमेदवारी अर्जामुळे सरपंचपदी बिनविरोध निवड

शिरगाव (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे साहिल मंगेश पांचाळ यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून त्यांनी २१ मे रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चाफेड गावच्या इतिहासातील सर्वात तरुण सरपंच म्हणून साहिल पांचाळ यांचे नाव घेतले जात आहे.

चाफेड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. किरण मेस्त्री यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर उपसरपंच महेश राणे यांनी प्रभारी सरपंच म्हणून जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. पुढे झालेल्या पोटनिवडणुकीत साहिल मंगेश पांचाळ यांच्या सरपंचपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, उपसरपंच महेश राणे, माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, सुदर्शन साळकर, सौ. मानसी परब, माजी सरपंच संतोष साळसकर, आकाश राणे, चंद्रकांत साटम, सचिन मोडकर, महेश परब, ग्रामसेवक प्रथमेश देशमुख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम आणि उपसरपंच महेश राणे यांनी नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांना शुभेच्छा दिल्या.

माजी सरपंच कै. किरण मेस्त्री यांनी आपल्या अल्प कार्यकाळात गावाच्या विकासकामांत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांचा विकासाचा वारसा साहिल पांचाळ यांनी पुढे न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केले.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच साहिल पांचाळ यांनी संपूर्ण गावाने आपल्याला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच, यापुढे सर्वांना सोबत घेऊन काम करत गाव एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.