प्रहार विशेष! कोकण रेल्वेतर्फे पॅच डब्लिंगचा प्रस्ताव

मंजुरीकरिता प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविणार

डब्लिगसाठी खर्च ८० ते १०० कोटी

देवेंद्र जाधव | खेड : निसर्गरम्य आणि अद्भूत मानल्या जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची क्षमता वाढविण्यासाठी या मार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी जोर धरत आहे. परंतु डोंगर आणि दऱ्याखोऱ्यातून धावणाऱ्या ७४१ किमी मार्गाचे सरसकट दुपदरीकरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने कोकण रेल्वे महामंडळाने पॅच डब्लिंगचा (टप्पा) निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वेला संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण करण्याची आवश्यकता नाही. या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीकरिता रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरुन दिवसभरात सुमारे ५५ मेल-एक्सप्रेस आणि १८ मालगाड्या धावतात. कोकण रेल्वे मार्ग हा एकेरी असल्याने या मार्गावरुन गाड्यांची संख्या वाढविण्यावर बंधने येतात. त्यामुळे सन २०१६मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचे दुपदरीकरणाचा निर्णय घेतला. त्यानुसार अर्थसंकल्पात घोषणा देखील केली. परंतु कोकण रेल्वे डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यातून धावत असल्याने आर्थिक दृष्ट्या खुपच खर्चिक असल्याने दुपदरीकरणाची योजना मागे पडली. सध्या वीर ते रोहा या ४६ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण झाले आहे. हा मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो

याचा फायदा काय ?

दोन स्थानकांमध्ये खूप जास्त अंतर असेल, तर एक गाडी एका टोकाच्या स्थानकावर थांबून राहते. दुसरी गाडी पहिल्या स्थानकापासून या स्थानकापर्यंत पोहोचेपर्यंत या गाडीला थांबावे लागते. अनेकदा या प्रकियेसाठी २५-३० मिनिटे जातात. या दोन स्थानकांच्या मध्ये एक स्थानक उभे केल्यास दोन्ही गाडया त्या स्थानकापर्यंत येऊ शकतील. या स्थानकात दोनपेक्षा जास्त मार्गिका असल्याने त्या गाड्या गरज पडल्यास दोन ते पाच मिनिटे एवढाच वेळ थांबून पुढे मार्गस्थ होतील. अशा पद्धतीने खूप वेळ वाचणार असून त्याद्वारे सध्या चालवण्यात येणाऱ्या ५५-६० गाड्यांच्या संख्येत दुपटीने वाढ करून ही संख्या १०० ते १२० एवढी करता येणे शक्य होणार आहे.

कोणत्या भागाचे होणार दुपदरीकरण

खेड-आरवली

कणकवली – सावंतवाडी

मडगाव -ठोकूर

मदुराई -थिविम