महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन
महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव प्रेक्षकांसाठी ठरली पर्वणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : बदलत्या डिजिटल युगात करमणुकीची साधने बदलली असली, तरी महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककलांचे वैभव आजही तितकेच श्रेष्ठ आहे. या लोककलांचे जतन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून होत आहे हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते गणेश ठाकूर यांनी येथे व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘असंघटित लोककलांचा महोत्सव’ ही रसिकांसाठी एक अभूतपूर्व पर्वणी असून, लोप पावत चाललेल्या लोककला अनुभवण्याची हीच खरी संधी आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित या तीन दिवसीय लोककला महोत्सवाचा अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. येथील बॅ. नाथ पै सभागृहात २२, २३ व २४ मे या कालावधीत हा महोत्सव रंगणार असून, शुक्रवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नाट्य दिग्दर्शक व अभिनेते गणेश ठाकूर, अभिनेत्री सोनल लेले, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर आणि आर्यन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी करपल्लवी, गोंधळी, बहुरूपी, धनगरी ओवी, हेळवी लोककलावंतांचे सादरीकरण, तसेच फुगडी आणि झिम्मा यांसारख्या पारंपरिक व काळाच्या पडद्याआड चाललेल्या लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणामुळे बॅ. नाथ पै सभागृह लोकसंस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
शनिवार आणि रविवारी विविध कलाविष्कारांची मेजवानी
या महोत्सवांतर्गत शनिवारी (२३ मे) आदिवासी पाटा गायन, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लैंगी बंजारा नृत्य यांसारखे वैविध्यपूर्ण कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. तर महोत्सवाच्या अंतिम दिवशी, रविवारी (२४ मे) कोकणच्या समृद्ध लोककलेचा कणा असलेले पारंपरिक दशावतार नाटक, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, दिमडी, ढोलकी, आणि ढोल-ताशा वाद्यवृंदाची जुगलबंदी यासोबतच भारुडाचे सादरीकरण होणार आहे. हे सर्व कलाप्रकार प्रेक्षकांसाठी या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा आणि दुर्मीळ लोककला प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सावंतवाडी व परिसरातील जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी, नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी या महोत्सवाला उपस्थित राहून कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













