काँग्रेसला देशद्रोही ठरवायचे का? : आमदार निलेश राणे

राहुल गांधींसह विरोधकांच्या वक्तव्यांचा घेतला समाचार!

खा. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार, या ही केवळ अफवाच!

मालवण | प्रतिनिधी : मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर निशाणा साधताना आमदार निलेश राणे म्हणाले, २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्या पुनर्रचनेनंतरच मी काँग्रेसचा खासदार होतो. लोकसंख्येतील बदल व अन्य निकषांनुसार मतदारसंघांची पुनर्रचना करणे आवश्यक ठरते. काँग्रेसच्याच काळात ही प्रक्रिया राबविण्यात आली होती, मग काँग्रेसला देशद्रोही ठरवायचे का? असा रोखठोक सवाल आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला.

मालवण येथील निलरत्न निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार निलेश राणे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, नगरसेवक रविकिरण तोरसकर, जॉन नन्होना, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार, या केवळ अफवा!

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना आमदार निलेश राणे यांनी राहुल गांधी, संजय राऊत, संदीप देशपांडे, सौरभ दास यांच्यासह अन्य विरोधकांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा ही केवळ अफवा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा व्यापक विस्तार

मोठी लोकप्रियता लाभलेले शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षप्रवेश सुरूच असून पक्षाचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे, असे आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.