दापोली (विशेष प्रतिनिधी) : हाँगकाँग येथे २३ आणि २४ मे रोजी होणाऱ्या ७व्या एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघ आज रवाना झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचा युवा खेळाडू नकुल कारेकर याची भारतीय संघात निवड झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दापोली तालुक्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स हा ऑलिंपिकमधील अत्यंत कौशल्यपूर्ण आणि रोमांचक खेळ प्रकार मानला जातो. या स्पर्धेत खेळाडू हवेत उंच उडी घेत विविध फ्लिप्स, ट्विस्ट्स आणि ऍक्रोबॅटिक्स कौशल्य सादर करतात. खेळाडूंची उडीची उंची, अचूकता, संतुलन आणि अवघड कौशल्यांच्या आधारे गुणांकन केले जाते. या खेळासाठी शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो.
एप्रिल महिन्यात चेन्नई येथे झालेल्या निवड चाचण्यांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात मोठ्या प्रमाणात स्थान मिळवले आहे. भारताच्या ३२ सदस्यीय संघात तब्बल २३ खेळाडू महाराष्ट्रातील असल्याने राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही गौरवाची बाब ठरत आहे.
दापोली तालुक्यातील युवा खेळाडू नकुल कारेकर याने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपली क्षमता सिद्ध केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत विशेष छाप पाडली आहे. त्याच्या या यशामुळे दापोली तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, दापोली तालुक्यातील आसूद गावचे श्री तेजस बेंद्रे हे प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबत हाँगकाँगला रवाना झाले आहेत. खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पवन भोईर, योगेश शिर्के, श्रीकांत राठोड, शुभम तांबे, शिवानी दौंड यांच्यासह तेजस बेंद्रे हे प्रशिक्षक संघासोबत उपस्थित राहणार आहेत.
भारतीय संघाच्या या सहभागामुळे देशाच्या ट्रॅम्पोलिन क्रीडा क्षेत्राला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून संपूर्ण भारतीय संघाला विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.













