इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूळ गुणपत्रक व प्रमाणपत्र २५ मे रोजी मिळणार!

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचे मूळ गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि शालेय अभिलेख यांचे वाटप सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी केले जाणार आहे. कोकण विभागीय मंडळासह राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत ही प्रक्रिया राबवली जाईल.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी आणि कोकण विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेचा ऑनलाईन निकाल २ मे २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना २५ मे रोजी सकाळी ११.०० वाजता मंडळाकडून गुणपत्रकांचे वाटप केले जाईल.

विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजल्यापासून वाटप

कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांना सकाळी साहित्य प्राप्त झाल्यानंतर, त्याच दिवशी (२५ मे) दुपारी ३.०० वाजता सर्व संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.
कोकण विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकांनी या वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.