राष्ट्रसेवा दलाची ‘सागर ते सह्याद्री बीज अंकुरे’ पर्यावरण जनजागृती सायकल यात्रा सुरू

किल्ले विजयदुर्ग ते गोवा मुक्ती स्मारक दोडामार्ग असा सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास

देवगड : राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्गच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सागर ते सह्याद्री बीज अंकुरे’ या सायकल यात्रेला आज किल्ले विजयदुर्ग येथून उत्साहात प्रारंभ झाला. किल्ले विजयदुर्ग ते गोवा मुक्ती स्मारक दोडामार्ग असा सुमारे २०० किलोमीटरचा हा प्रवास असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

 

या यात्रेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते राजू परुळेकर यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ झेंडा दाखवून करण्यात आला. यात्रेच्या पहिल्या टप्प्याला विजयदुर्गचे सरपंच सादिक काजी यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पहिला टप्पा विजयदुर्ग ते देवगड असा पार पडणार आहे.

 

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते व या यात्रेचे संयोजक नितीन वाळके यांनी पर्यावरणाच्या वाढत्या समस्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, यावर्षी कोकणाने अभूतपूर्व उष्णतेचा सामना केला. वारंवार होणारी वादळे, अवकाळी पाऊस आणि बदलत चाललेले हवामान हे पर्यावरणाच्या असमतोलाचे परिणाम आहेत. कोकण आजही हिरवागार असल्यामुळे इतर भागांच्या तुलनेत आपण काही प्रमाणात चांगल्या परिस्थितीत जगत असलो, तरी पर्यावरण संवर्धनासाठी अधिक सजग होण्याची गरज आहे.

 

नितीन वाळके पुढे म्हणाले की, संविधान पदयात्रेदरम्यान सिंधुदुर्गातील अनेक जलस्रोतांची अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळाली. पूर्वी स्वच्छ असलेल्या नद्या, वाळी आणि ओढे आज सांडपाण्यामुळे प्रदूषित झाले आहेत. लहानपणी नदीत डुंबणे, नाल्यात मासे पकडणे हा आनंदाचा भाग होता; मात्र आज अनेक जलस्रोत गटारांचे स्वरूप धारण करत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. याच जाणिवेतून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ही सायकल यात्रा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

या यात्रेद्वारे गावोगावी जाऊन पर्यावरण संरक्षण, जलस्रोत स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि निसर्ग जतनाचा संदेश देण्यात येणार आहे.

 

यावेळी प्रवीण नाईक, सुहास ठाकूर देसाई, पी. डी. शिरसाट, संजय वेतुरेकर, दयानंद मांजरेकर, हरिहर वाटवे, विजयलक्ष्मी छिंदक, युगांत चव्हाण, सहदेव पाटकर, रवी खोत, बाळू मिस्त्री, तन्मय पंडित, वेदांश बांदेकर, सोहम वेतुरेकर, आर्या खडपकर आणि मूर्ती कासार आदी उपस्थित होते.

•  आज दुपारी विश्रांती घेऊन मार्गे आचरा येथे प्रस्थान
• आचरा येथे सायकल यात्रेचा पहिला मुक्काम

▪️ उद्या (पहिला दिवस)
• सकाळी : आचरा ते मालवण हा पहिला टप्पा
• संध्याकाळी : मालवण – कट्टा – वर्हाड – सोनवणे पार्क – कुडाळ हा दुसरा टप्पा
• संध्याकाळी ७.३० वा. : कुडाळ आंबेडकर चौक येथे जाहीर सभा
• पश्चिम घाट संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणाऱ्या गोव्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन
• रात्री : कार्यकर्त्यांची बैठक व चर्चा

▪️ परवा (दुसरा दिवस)
• सकाळी : कुडाळवरून सावंतवाडीच्या दिशेने प्रस्थान
• मार्ग : इंगुळी मठ – कांबळे – वीर – अकेरी – सावंतवाडी
• संध्याकाळी ७.३० वा. : सावंतवाडी शिवउद्यान येथे जाहीर सभा
• पर्यावरण संवर्धन विषयावर विचारमंथन व कार्यकर्त्यांशी चर्चा
• Mining आणि Survey संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा

▪️ मंगळवार
• सकाळी : सावंतवाडी येथून प्रस्थान
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून यात्रेची सुरुवात
• मार्ग : कोटवणे – वाकोली – बांदे – विलवडे – दोडामार्ग
• संध्याकाळी : महाराजांचे प्रवचन

▪️ बुधवार
• सकाळी ८ वा. : गोवा मुक्ती आंदोलन स्मारक येथे कार्यक्रम
• मणी सर यांच्याकडून पर्यावरण संरक्षणाची शपथ
• कलानंद यांचे सादरीकरण
• पर्यावरण अभ्यासक सुजित कुमार डोंगरे यांचे मार्गदर्शन व सादरीकरण
• हळवे कॉलेज येथे कार्यक्रमाचा समारोप / पुढील सत्र