ओमळी ग्रामपंचायतीत पशुधन योजना मार्गदर्शन व औषध वाटप कार्यक्रम उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : ओमळी ग्रामपंचायत येथे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांच्या माध्यमातून पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेला ‘पशुधन विविध योजना मार्गदर्शन व पशुधन औषध वाटप’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.
शासन व जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पशुधन योजनांची माहिती गावातील पशुपालकांपर्यंत पोहोचावी तसेच गाई, म्हशी व इतर जनावरांच्या आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित प्रमुख शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. पूजा निकम यांनी बदलत्या काळात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन व्यवसायाकडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण व औषधोपचाराचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी पशुपालकांना जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी व सहाय्यक डॉक्टरांनी पशुधनाचे आरोग्य, साथीच्या आजारांपासून बचाव, लसीकरणाचे महत्त्व तसेच योग्य पशुखाद्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर सौ. पूजा निकम व मान्यवरांच्या हस्ते पशुपालकांना विविध पशुधन औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला ओमळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्राजक्ता जाधव, उपसरपंच विवेक कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यादव तसेच परिसरातील अनेक शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.