विचारणा कारण्यास गेलेल्या गाईडला धक्काबुक्कीचा प्रकार : हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मालवण | प्रतिनिधी: किल्ले सिंधुदुर्ग येथे आरडाओरडा करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटक युवकांना समज दिल्याच्या रागातून स्थानिक पर्यटक गाईडला धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी स्थानिकांनी पोलीसांना माहिती दिली. पोलीस किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाले. त्यांनी पर्यटकांना ताब्यात घेऊन मालवण पोलीस
ठाण्यात आणून समज दिली.
मिळालेल्या माहितीनुसार किल्ले सिंधुदुर्ग येथे सात ते आठ युवकांचा एक ग्रुप आरडाओरड मारून धिंगाणा घालत होते. हा प्रकार होत असल्याने पर्यटक गाईड यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पर्यटकांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असताना पर्यटकांकडून गाईडला धक्काबुक्की करण्यात आली. स्थानिक युवकाला मारहाण होत असल्याचे पाहून किल्ले रहिवासी आणि
इतर पर्यटकांनी गाईडला बाजूला करत पर्यटकांची चांगलीच हजेरी घेतली. यात काही पर्यटकांनी पळ काढला. तर दोघे पर्यटक स्थानिकांच्या ताब्यात मिळाले.
पर्यटकांनी हुज्जत घालून तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? असा प्रश्न करत स्थानिकांनाच मारहाण केल्याने अशा पर्यटकांना स्थानिकांनी चांगली समज दिली आहे. दरम्यान, पोलीसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी तात्काळ पोलीस अधिकारी यांना किल्ले सिंधुदुर्ग येथे पाठवून हुल्लडबाज पर्यटकांना मालवण पोलीस ठाण्यात आणले. जबाब नोंद घेऊन संबंधितांवर रात्री उशीरापर्यंत कार्यवाही सुरु होती.













