दापोली | राकेश कोळी
दापोली तालुक्यातील उन्हवरे गाव सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याने हादरले आहे. १९ जुलै रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वाद आणि दारूच्या व्यसनामुळे चिघळलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रवींद्र तांबे (वय ४२) याला अटक केली आहे.
उन्हवरे गावातील बौद्ध वाडीत विनोद गणपत तांबे (वय ३६) आणि त्याचा मोठा भाऊ रवींद्र तांबे हे दोघे त्यांच्या आई संगीता (वय ७५) यांच्यासोबत राहत होते. विनोद मोलमजुरी करून घर चालवत असे, तर रवींद्र कोणताही कामधंदा करत नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही भावांना दारूचे व्यसन होते आणि याच कारणामुळे रवींद्रची पत्नी १२ वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र आणि विनोद यांच्यात नेहमीच किरकोळ कारणावरून भांडणे होत असत. १९ जुलै रोजी त्यांच्या भावकीची बैठक होती, ज्यात विनोदने रवींद्रला अपशब्द वापरले. याचा राग रवींद्रच्या मनात होता. रात्री पावणेबाराच्या सुमारास याच मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रवींद्रने रागाच्या भरात धारदार कुऱ्हाडीने आणि फरशीने विनोदच्या डोक्यात वार केले, ज्यामुळे विनोद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह दापोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्र तांबेला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने आणि दापोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तपासात फॉरेन्सिक टीमचीही मदत घेण्यात येत आहे.
एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांमध्ये घडलेल्या या घटनेने उन्हवरे गावात शोककळा पसरली आहे आणि कौटुंबिक वाद तसेच व्यसनाधीनतेचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.






