सावंतवाडीत ‘महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव’ उत्साहात 

सावंतवाडीत ‘महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव’ उत्साहात

 

रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे “महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव – असंघटीत लोककलावंतांचा महोत्सव” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून सुमारे १५० लोककलावंत सहभागी झाले असून ते महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे सजीव दर्शन घडवत आहेत. लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा जपणाऱ्या विविध कलाप्रकारांनी सजलेला हा महोत्सव येथील रसिक प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे.

महोत्सवांतर्गत शनिवारी विविध दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये खेळ कळसूत्री बाहुल्यांचा, कोळी नृत्य, मयूर नृत्य, फुगडी आणि झिम्मा, गोंधळ आणि छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक या कलाप्रकारांचा समावेश होता. या सर्वच उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना भुरळ घातली.

शनिवारी झालेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी येथील ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. ॲड. अरुण पणदूरकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, तसेच महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे आणि आर्यन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व कलावंतांचे भव्य स्वागत करण्यात आले.

याच कार्यक्रमादरम्यान प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेतील दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या भार्गवी अंकुश शेटवे या विद्यार्थिनीचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच इन्सुली येथील श्री. व सौ. राणे दांपत्याचा स्वाध्याय परिवाराचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले, तर मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सांगली येथील सुप्रसिद्ध निवेदक संतोष जाधव यांनी केले.

या महोत्सवाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, शनिवारी मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आज रविवारी देखील हा महोत्सव हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि कलात्मक विविधतेचे अद्भुत दर्शन घडत आहे.

दरम्यान, आज रविवारी महोत्सवात कोकणातील पारंपरिक दशावतार, डोंबारी, भारूड, समई नृत्य आणि कोळी नृत्य यांसारखे पारंपरिक व लोकप्रिय कार्यक्रम सादर होणार आहेत. या सांस्कृतिक सोहळ्यास सर्व कला रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.