कणकवली : ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी कणकवली पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले.
हे पथसंचलन कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे, महेश शेडगे, हवालदार सुभाष शिवगण यांच्यासह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ईद सणाच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दंगल नियंत्रण पथकाचाही या संचलनात समावेश करण्यात आला होता. पोलिस ठाण्यापासून सुरू झालेल्या या पथसंचलनाने अप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठ, झेंडा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्गक्रमण करत पुन्हा पोलिस ठाण्यात समारोप केला.













