एकास अटक, २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपीने दादा घेवारी च्या नेतृत्वाखाली मटका घेत असल्याची दिली कबुली
कणकवली : कणकवली शहरातील टेंबवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) गुरुवारी सायंकाळी छापा टाकून एका युवकाला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा एकूण २७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोहेकॉ ज्ञानेश्वर गुरुनाथ तवटे यांना टेंबवाडी येथील नमो साईनाथाय पान शॉप टपरीमध्ये कल्याण मटका जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोहेकॉ किरण देसाई व पोहेकॉ तवटे यांनी पंचांना सोबत घेऊन छापा टाकला.
सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास टेंबवाडी येथील सर्व्हिस रोडलगत असलेल्या नमो साईनाथाय पान शॉप टपरीमध्ये एक इसम हातात पावती बुक घेऊन काही आकडे लिहिताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव पंकज दिपक बागवे (वय २९ वर्षे, रा. टेंबवाडी, कणकवली, ता. कणकवली) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील पावती बुकाची तपासणी केली असता त्यामध्ये कल्याण मटका जुगाराचे आकडे व त्यासमोरील रकमा लिहिलेल्या आढळून आल्या.
पोलिसांनी केलेल्या झडतीत त्याच्याकडून कल्याण मटका जुगाराच्या नोंदी असलेले पावती पुस्तक, एक बॉलपेन, कार्बन पेपर, १८ हजार १० रुपये रोख रक्कम तसेच व्हिवो कंपनीचा व्ही-२२ मॉडेलचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची किंमत अंदाजे ९ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान पंकज बागवे याने आपण कल्याण मटका जुगाराचे आकडे स्वीकारून हा जुगार दादा घेवारी (रा. कणकवली) याच्यासाठी चालवत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या कारवाईत पंच म्हणून देवराम रमेश कदम (वय ३२, रा. आशीये, टेंबवाडी) व परशुराम लखाप्पा बगले (वय ४०, रा. पोयेकरवाडी, कणकवली) यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी पंकज दिपक बागवे (वय २९, रा. टेंबवाडी, कणकवली) आणि दादा घेवारी (रा. कणकवली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.










