चिपळुणात ३० रोजी ‘शिवराज भूषण’ महानाट्य

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ८० कलाकारांच्या संचात अवतरणार इतिहास
चिपळूण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी श्री शिवराज मंच मालवणतर्फे एक विशेष उपक्रम म्हणून ‘शिवराज भूषण’ हे भव्य महानाट्य शहरात सादर होणार आहे. या महानाट्याच्या शुभारंभ प्रसंगी कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे, आमदार शेखर निकम, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती निर्माता भूषण साटम, संजय शिंदे, समीर शिंदे, दिनेश आंगणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तर या पत्रकार परिषदेला साहित्यिक प्रकाश देशपांडे आवर्जून उपस्थित होते.
‘शिवराज भूषण’ हे महानाट्य ३० मे रोजी रात्री ९.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर होणार आहे. कवी भूषण यांनी १६७१ मध्ये रायगडावर महाराजांच्या शौर्याचे जे वर्णन आपल्या साहित्यातून केले होते त्याच अजरामर काव्यावर या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे ८० कलाकार, अंगावर शहारे आणणारे संगीत आणि विशेष प्रकाशयोजनेच्या माध्यमातून महाराजांची युद्धनीती आणि अष्टप्रधान मंडळाचे चोख नियोजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती निर्माता साटम यांनी दिली. या महानाट्यातून शिवरायांची शौर्यगाथा, इतिहास, हिंदुत्व आपल्यासमोर येणार आहे. आतापर्यंत सात प्रयोग सादर झाले आहेत या सातही प्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आता आठवा प्रयोग चिपळूणमध्ये होत आहे. तरी चिपळूणवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे. साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी देखील आवाहन केले आहे.