गगनबावडा येथे ट्रकची सात वाहनांना धडक

या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार : दोन गाईंचाही मृत्यू

विविध वाहनांचे अठरा लाखांचे नुकसान : इतर प्रवाशी बालबाल बचावले

वैभववाडी प्रतिनिधी :
ट्रकची जोरदार धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा बसस्थानक चौकात घडली. अपघातानंतर बिथरलेल्या ट्रक चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. आणि चौकात उभ्या असलेल्या सात वाहनांना धडकला. सुदैवाने यात जीवीतहानी टळली. मात्र तो ट्रक दोन गाईंच्या अंगावरून गेल्याने त्या मुक्या प्राण्यांचा हाकनाक बळी गेला.

मयत दुचाकीस्वार अखिल रमजान थोडगे वय २२ रा. गगनबावडा कातळी येथील रहिवाशी आहे. ही घटना रविवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रकचालक याच्यावर गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करूळ घाटातून कोल्हापूरकडे ट्रक चालक विजय बापू शिंदे हा आपल्या ताब्यातील ट्रक ( नं. एमएच 12 एक्सएम 4056,) घेऊन जात होता. या भरधाव ट्रकने गगनबावडा येथील भक्त निवास इमारती जवळ दुचाकीवर थांबलेल्या अखिल थोडगे या युवकाला धडक दिली. या धडकेत अखिल काही फूट अंतरावर फरफटत जाऊन पडला. यात त्याचा जागीच अंत झाला. दरम्यान, या ट्रकने चौकात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक, मिनी ट्रॅव्हल व चारचाकी वाहनाला धडक दिली. सुदैवाने या वाहनात प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच चार दुचाकीना हाच ट्रक धडकल्याने त्या सर्व दुचाकीचा चक्काचूर झाला. बसलेल्या गाईंच्या अंगावरून हा ट्रक गेला. यात दोन गाईंना आपला जीव गमवावा लागला. सर्वांना धडक देत तो ट्रक बाजूच्या दुकानात घुसला. दुकानात उभी असलेली महिला यात किरकोळ जखमी झाली आहे.

या विचित्र अपघातात मिनी ट्रॅव्हल, कार, दुचाकी व दुकान यांचे अंदाजे 18 लाख इतके नुकसान झाले आहे. जखमींवर गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भीषण अपघातातील फरार ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्या विरूध्द गगनबावडा पोलिस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.डी. साळुंखे हे करत आहेत.