मिठमुंबरी समुद्रात बुडालेल्या चैतन्य गुरवचा मृतदेह २४ तासांनंतर सापडला

कांदळवन परिसरात उपड्या अवस्थेत मृतदेह आढळला; स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे शोधाला यश

ड्रोनच्या सहाय्याने प्रशासनाची युद्धपातळीवरील शोधमोहीम; परिसरात हळहळ

देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बौद्धवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या चैतन्य राजेंद्र गुरव या तरुणाचा मृतदेह अखेर तब्बल २४ तासांनंतर सापडला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली होती.

सोमवारी सायंकाळी सुमारे ५.५० वाजण्याच्या सुमारास मिठमुंबरी कांदळवन बागवाडी परिसरात चैतन्य गुरव याचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक रहिवासी लक्ष्मण तारी यांचे चिरंजीव मयुरेश तारी हे कांदळवन सफारीसाठी गेले असता त्यांना मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती स्थानिकांना दिल्यानंतर रमेश तारी, मत्स्यव्यवसाय सुरक्षा रक्षक इंद्रदिप येरम, सरपंच बाळकृष्ण गावकर तसेच पोलीस पाटील दयानंद मुंबरकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

या शोध मोहिमेत तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले होते. मत्स्य विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने समुद्रकिनाऱ्यालगत विविध भागांत शोधमोहीम राबविण्यात आली होती.

दरम्यान, घटना घडली त्यावेळी स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे तिघा तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते. तर एका तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र चैतन्य गुरव हा समुद्रात बेपत्ता झाला होता.

अखेर सुमारे २४ तासांच्या अथक शोधानंतर चैतन्य गुरव याचा मृतदेह सापडला असून नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे मिठमुंबरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काय घडले होते नेमके?

मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेत मुंबईतील पाच मित्रांपैकी चैतन्य राजेंद्र गुरव हा युवक समुद्रात बुडून बेपत्ता झाला होता. सुट्टीसाठी देवगडमध्ये आलेले हे युवक सायंकाळी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चौघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले, तर यश उपरकर हा किनाऱ्यावरच थांबला होता.

समुद्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पोहत असलेले चौघेजण अचानक बुडू लागले. त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक मारल्यानंतर स्थानिक रहिवासी रमेश तारी, लक्ष्मण तारी, मनीष तारी, बाबूराव धुरी आणि बाळा राजम यांनी तत्काळ समुद्राकडे धाव घेतली. काहींनी थेट पाण्यात उतरून तर काहींनी नौकेच्या सहाय्याने मदतकार्य सुरू केले.

स्थानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे ओम चव्हाण, सोहम मंडोद आणि अर्णव तारी यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. यातील सोहम मंडोद हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन शुद्धीवर आणण्यात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र या गोंधळात चैतन्य गुरव हा समुद्राच्या पाण्यात दिसेनासा झाला. त्यानंतर स्थानिक रहिवासी, प्रशासन आणि मत्स्य विभागाच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. ड्रोन कॅमेरे आणि नौकांच्या सहाय्याने समुद्रकिनाऱ्यालगत विविध भागांत शोध घेण्यात आला. अखेर सोमवारी सायंकाळी मिठमुंबरी कांदळवन बागवाडी परिसरात चैतन्य गुरव याचा मृतदेह उपड्या अवस्थेत आढळून आला.