राजापूर प्रतिनिधी: राजापूर संगमेश्वर येथील हॉटेल मधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील त्या संशयीत आरोपींचा शोध घेण्यासाठी राजापूर व संगमेश्वर पोलीसांचे एक विशेष पथक कर्नाटक मध्ये पाठविण्यात आले आहे. या पथकाकडून या चोरटयांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
गसप्ताहात सोमवारी १८ मे रोजी राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वर मधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या चार संशयीत आरोपींनी महामार्गावर तुरळे येथे गाडी सोडून पलायन केले होते. पोलीसांना या गाडीत सात मोबाईल व नऊ हॉटेल व लॉजिंगची नोंदणी रजिस्टर आढळून आली होती. दरम्यान हे चारही संशयीत आरोपी हे कर्नाटक येथील असल्याचे तपासात पुढे आले होते. यानंतर राजापूर पोलीसांकडून कर्नाटक पोलीसांशी संपर्क साधण्यात आला होता.
या आरोपींनी वापरलेली ती गाडी ताब्यात घेतली आहे. तर त्या गाडीत सापडलेले सात मोबाईल फोन व नऊ नोंदणी रजिस्टर पोलीसांनी ताब्यात घेतले होते. या सात पैकी सहा एन्ड्रॉईड मोबाईल असून दोन साधे मोबाईल आहेत. यात एक आयफोन सापडला असून तो चोरीचा असल्याचे तपासात पुढे आले होते.
या प्रकरणी पोलीसांकडून कर्नाटक पोलीसांशी संपर्क साधल्यानंतर आता पोलीसांचे एक विशेष पथक कर्नाटक मध्ये गेले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशाने व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस उपनिरीक्षक मोमीन शेख यांच्या नेत्वत्वाखाली हे पथक कर्नाटक येथे गेले असून कर्नाटकातील हरपनहल्ली या भागात या संशयीतांचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच हे संशयीत सापडतील असा दावाही पोलीसांनी केला आहे.












