धार्मिक कार्यक्रमासाठी आते कडे आला असता अपघाती निधन
मूळ गाव सोनवल
दोडामार्ग प्रतिनिधी :
तालुक्यातील कुडासे-वानोशी येथील तिलारी नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वेदांत सचिन सांगेलकर (वय १३, रा. मुंबई) असे मृत बालकाचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आपल्या आतेकडे धार्मिक कार्यक्रमासाठी आला असताना हा काळाचा घाला आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत सांगेलकर हा इयत्ता सहावीत शिकत होता. दोडामार्ग येथील त्याच्या आतेकडे एक धार्मिक कार्यक्रम असल्याने तो आणि त्याचा चुलत भाऊ आले होते. आज मंगळवारी (दि. २६) सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते कुडासे येथील नदीवर अंघोळीसाठी गेले होते.
अंघोळ करत असताना अचानक वेदांतचा पाय खोल पाण्यात गेला आणि तो बुडू लागला. सोबत असलेल्या चुलत भावाने त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही.
भेडशी ग्रामीण रुग्णालयात मृत घोषित
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेत वेदांतला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तात्काळ भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाच्या आवारात स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कुडासे येथील नदीपात्रात पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते. येथे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी अलिकडेच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काही दिवस येथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा घडलेल्या या दुर्घटनेमुळे नदीपात्रातील सुरक्षेचा आणि जीवरक्षकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. वेदांतच्या अचानक जाण्याने सांगेलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












