देवगड (प्रतिनिधी)आपल्या पडेल गावचे सुपुत्र आणि मुंबई शहराचे नवनियुक्त उपमहापौर श्री. संजय घाडी यांचा स्थानिक शाळेत ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला. मुंबईच्या उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना उपमहापौर संजय घाडी यांनी गावाशी असलेले आपले ऋणानुबंध व्यक्त केले आणि गावाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली.
या विशेष सोहळ्याला शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पडेल ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक पाटणकर, सचिव श्री. जितेंद्र मांजरेकर, खजिनदार श्री. दत्ताराम बाणे, आणि कार्याध्यक्ष संदीप तानवडे यांनी उपस्थित राहून नवनियुक्त उपमहापौरांचे अभिनंदन केले. शाळा समितीचे चेअरमन श्री. दीपक पडेलकर, सदस्य संजय घाडी, आणि मंडळाचे सदस्य गणेश हर्याण यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.











