देवगड स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष ललित चांदोस्कर यांची माहिती
देवगड / प्रतिनिधी
देवगड स्पोर्टस् क्लब आणि देवगड अँगलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने देवगडच्या मिठमुंबरी बीचवर ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत फिशिंग टुर्नामेंट २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रातील मासेमारीचे कौशल्य आणि स्पर्धेचा थरार अनुभवण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. स्पोर्टस् क्लबचा हा पहिला स्पोर्टिंग इव्हेंट आहे. या स्पर्धेत कोकण, कर्नाटक आणि गोव्यामधील एकूण ३० नामांकित एंग्लर्स सहभागी होणार असून या स्पर्धेचा तालुक्यातील युवा वर्गासह सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष ललित चांदोस्कर यांनी शुक्रवारी हॉटेल वेदा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्पोर्टस् क्लबचे सोहम पारकर, चिन्मय खानविलकर उपस्थित होते.
ललित चांदोस्कर यांनी स्पर्धेची रूपरेषा जाहीर केली. ते म्हणाले, फिशिंग हा देवगडशी संलग्न विषय आहे आणि देवगडच्या समुद्राशी जोडलेला विषय आहे. म्हणून देवगड स्पोर्टस् क्लबने पहिला स्पोर्टिंग इव्हेंट म्हणून फिशिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. Say No to Drugs अशी स्पर्धेची थीम आहे. युवा वर्गाने अमली पदार्थांच्या, ड्रग्जच्या व्यसनाधीन न जाता सोशल अॅक्टिव्हिटीझ आणि स्पोर्टिंग इव्हेंट्समध्ये जास्त सहभाग घेऊन एक चांगली स्पोर्टिंग कम्युनिटी तयार करावी, असा स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत जे मासे एंग्लर्स पकडणार आहेत, ते मासे ‘Catch and Release’ (पकडा आणि सोडा) केले जाणार आहेत. समुद्र जीवाला कोणतीही हानी पोहोचू नये तसेच कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये, अशी आमची धारणा आहे. स्पर्धेतील प्रथम व -मांकाच्या विजेत्यास ११ हजार १११ रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये व ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार ३३३ रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
याशिवाय स्पर्धेत पहिला कॅच, शेवटचा कॅच आणि सर्वाधिक कॅच यासाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांचे विशेष बक्षीस ठेवण्यात आले आहे. पहिल्या तीन क्रमांकांची बक्षीसे ही स्पर्धेतील पकडण्यात येणाऱ्या माशांच्या वजनावर अवलंबून आहेत. तर उत्तेजनार्थ बक्षीसे ही
‘First Catch’, ‘Last Catch’ आणि ‘Maximum Catch’ साठी आहेत. स्पर्धेतील उर्वरित सर्व स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. तरी हा रोमांचक आणि साहसी खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चांदोस्कर यांनी केले आहे.













