गरिबांना त्रास देणाऱ्या महसूल विभागा विरोधात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन- भरत लब्धे

चिपळूण (प्रतिनिधी) : घरकुल लाभार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाच ब्रास वाळू द्यायचे धोरण निश्चित आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे १८००० घरकुल लाभार्थी आहेत परंतु महसूल विभाग यामध्ये कुचराई करत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी या मोफत वाळू पासून वंचित राहिले आहेत. सुमारे सहा महिन्यापासून हे लाभार्थी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच तहसीलदार कार्यालय येथे अनेकवेळा खेपा मारून दमले आहेत. काहीतरी कारण सांगून त्यांना परत पाठवले जात आहे. कोणत्याही यंत्रणेने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.
सामाजिक कार्यकर्ते भरत लब्धे यांनी रत्नागिरी जिल्हा खनिकर्म अधिकारी जोशी, चिपळूणचे तहसीलदार लोकरे यांच्याशी अनेकवेळा संवाद साधला. परंतु ठराविक लाभार्थ्यांना वाळू देण्यात आली आहे. वाळू सर्वांना देणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना योग्य उत्तरे दिली जात नाहीत, त्यामुळे सोमवार दिनांक २५ मे रोजी पुन्हा एकदा भरत लब्धे यांनी तुळशीराम पवार व इतर सहकाऱ्यांसमवेत तहसील कार्यालयात जाऊन याची माहिती घेतली असता कार्यालयाकडून पाच ते सहा ब्रासच वाळू शिल्लक असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधला असता सुमारे चौदाशे आठ ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. एवढी वाळू शिल्लक असताना महसूल यंत्रणा या गरीब लाभार्थ्यांना वंचित ठेवत आहे. दिशाभूल करत आहे. याचाच अर्थ महसूल खाते बेजबाबदारपणे काम करीत आहे. कामकाजात कोणताही ताळमेळ नाही. आता घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे सोबत तहसीलदार कार्यालय या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रत्येक गावच्या सरपंचांनी आपल्या गावातील या घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळवून देण्यासाठी त्यांच्या समवेत या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे. या कामामध्ये कसूर करणाऱ्या जिल्ह्याच्या खनिकर्म अधिकारी जोशी यांच्यावर घरकुल लाभार्थ्यांना त्रास दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी, अशीही मागणी भरत लब्धे यांनी केली आहे. चिपळूण तालुक्यातील ज्या घरकुल लाभार्थ्यांना अद्याप मोफत वाळू उपलब्ध झाली नाही अशा लाभार्थ्यांनी भरत लब्ध्ये (९०११५१२९२९) व तुळशीराम पवार (८१४९३५५६७८) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळवून देण्यासाठी त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. सहकार्य न झाल्यास आंदोलन छेडावे, असेही आवाहन भरत लब्धे यांनी केले आहे.