जिल्हा केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. यामध्ये केरोसीन व धान्य वितरणातील गंभीर अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला असून दुकानदारांचे प्रलंबित कमिशन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. या अडचणी दूर न झाल्यास जिल्ह्यातील दुकानदार केरोसीन वितरण करण्यास तयार नसल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिली.
शासकीय निर्णयानुसार पुरवठा कार्यालयाकडून केरोसीन वितरणाची यंत्रणा राबवण्याची कार्यवाही सुरू आहे, मात्र यामध्ये अनेक तांत्रिक व व्यावहारिक अडचणी येत आहेत. नियमानुसार केरोसीन धान्य दुकानांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि सर्व कार्डधारकांना ते मिळाले पाहिजे. मात्र, केरोसीन डीलरना तातडीने बिल अदा करणे सध्यातरी दुकानदारांना शक्य नाही. त्यामुळे केरोसीनचे बिल हे प्रत्यक्ष वितरण केल्यानंतरच घेण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या अडचणी सुटेपर्यंत दुकानदार केरोसीन वितरण करणार नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, शासनाच्या आदेशानुसार एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे एकत्रित धान्य वाटप पॉज (PoS) मशिनद्वारे सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून गोदामात वेळेत धान्य उपलब्ध न झाल्यामुळे अनेक कार्डधारक अद्याप धान्यापासून वंचित आहेत. त्यातच पॉज मशिनवरून एप्रिल महिन्याचा धान्याचा साठा अचानक काढून टाकण्यात आला आहे. हा साठा तातडीने ‘कॅरीफॉरवर्ड’ करून मिळावा, जेणेकरून शिल्लक राहिलेल्या नागरिकांना वेळेत धान्य वितरण करता येईल, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. या सर्व त्रासासोबतच दुकानदारांच्या आर्थिक दुरवस्थेकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. आजवर दुकानदारांनी वितरित केलेल्या धान्याचे कमिशन प्रशासनाकडून अद्याप मिळालेले नाही. यामुळे रेशन दुकानदारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून हे थकीत कमिशन तातडीने जमा करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
रेशनिंग व केरोसीन चालक- मालक संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, वितरण व्यवस्थेतील या दोषांमुळे दुकानदार आणि नागरिक दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व मुद्द्यांचा तातडीने विचार करून केरोसीन व धान्य वितरण सुळीत करावे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या असून आता प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.