रेल्वेच्या धडकेत जखमी संतोष शेदुलकर यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

कसाल कारलेवाडीवर शोककळा; उपचारादरम्यान अखेरचा श्वास

सिंधुदुर्गनगरी : कसाल कारलेवाडी येथे रेल्वे ट्रॅकवर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या संतोष महादेव शेदुलकर (वय ५५, रा. कसाल कारलेवाडी, ता. कुडाळ) यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कसाल कारलेवाडी परिसरातील रेल्वे ट्रॅकवर संतोष शेदुलकर यांना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेदुलकर यांना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले.

डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते. कुटुंबीयही त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करत होते. मात्र नियतीने वेगळाच निर्णय घेतला आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ही दुःखद वार्ता समजताच कसाल परिसरात शोककळा पसरली.

संतोष शेदुलकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी उपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.