कळणे-भिकेकोनाळ सीमेवरील पुरातन ‘भीमाचे पाऊल’ अन् ‘सहा उकलं’ उपेक्षित!

पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींची मागणी; पुरातत्व विभागाने दखल घेण्याची गरज

दोडामार्ग | सुहास देसाई : तालुक्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा असलेल्या अनेक जागा आजही योग्य प्रसिद्धी आणि देखभालीअभावी उपेक्षित राहिल्या आहेत. असाच एक पूर्वजांचा आणि पौराणिक महत्त्वाचा अनमोल वारसा कळणे आणि भिकेकोनाळ गावाच्या सीमेवर निसर्गाच्या कुशीत विखुरलेला आहे. या ठिकाणी असलेले भव्य ‘भीमाचे पाऊल’ आणि ‘सहा उकलं’ (उखळ) हे आजही पूर्वजांच्या खाणाखुणा जपत उभे आहेत. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा पुरातन ठेवा काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनाने याचे तातडीने जतन करून हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

साडेआठ फुटांचे पाऊल आणि रहस्यमयी उखळ!

कळणे-भिकेकोनाळ सीमेवर असलेल्या एका खडकावर तब्बल साडेआठ फुटांचे महाकाय मानवी पाऊल उमटलेले दिसते. स्थानिक लोक अत्यंत श्रद्धेने याला ‘भीमाचे पाऊल’ म्हणून ओळखतात. हे पाऊल अतिशय पुरातन काळातील असून ते पाहताना इतिहासप्रेमी थक्क होतात. या पावलाच्याच जवळ खडकामध्ये कोरलेली ‘सहा उकलं’ (उखळ) आहेत. प्राचीन काळातील मानवी वस्ती किंवा पूर्वजांच्या अस्तित्वाचा हा एक मोठा आणि जिवंत पुरावा मानला जातो. अनेक वर्षांपासून हा ठेवा निसर्गाने स्वतःच्या कुशीत सुरक्षित ठेवला असला, तरी आता त्याला आधुनिक संरक्षणाची आणि संवर्धनाची नितांत गरज आहे.

पर्यटन विकासातून रोजगाराच्या संधी

सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. दोडामार्ग तालुक्यातही पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशा अनेक ऐतिहासिक व निसर्गरम्य जागा आहेत. कळणे-भिकेकोनाळ सीमेवरील या ऐतिहासिक परिसराचा विकास केल्यास, येथे मोठ्या संख्येने पर्यटक आणि इतिहास संशोधक आकर्षित होऊ शकतात. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हा केवळ एक दगड किंवा पाऊल नसून आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि इतिहासाचा अनमोल ठेवा आहे, जो भावी पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची आग्रही मागणी

या पुरातन वास्तूची पुरातत्व विभाग आणि प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कळणे गावचे सरपंच अजित देसाई यांनी प्रशासनाचे व पुरातत्व विभागाचे याकडे लक्ष वेधले असून, या जागेचे जतन करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थ डॉ. मनोज सावंत,प्रभाकर देसाई, जयराम देसाई, आपा देसाई व इतर ग्रामस्थांनीही या परिसरात जाण्यासाठी रस्ते, माहिती फलक आणि इतर आवश्यक पर्यटन सुविधा उपलब्ध करून देऊन हे ठिकाण तालुक्याच्या व जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर आणावे, अशी आग्रही मागणी केली आहे.