दोडामार्ग | सुहास देसाई :तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक बाबुराव जाधव यांची नुकतीच मुंबई येथील मंत्रालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी पालघर येथील कार्यकारी अभियंता योगेश बाबुराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील चराठा येथे आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे.
विनायक जाधव हे २०२३ मध्ये पदोन्नतीवर तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी तिलारी प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि मुख्य कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामांना गती देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या या अचानक झालेल्या बदलीमुळे आता ते मंत्रालयातील आपल्या नव्या पदावर रुजू होणार आहेत.
त्यांच्या जागी रुजू झालेले नवीन कार्यकारी अभियंता योगेश बाबुराव पाटील यांना जलसंपदा क्षेत्रातील कामाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी ते पालघर येथील ‘सूर्या मोठा प्रकल्प’ येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. त्याआधी, २०१८ ते २०२३ या काळात त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील ‘भातसा मोठा प्रकल्प’ येथे सेवा बजावली होती. या कार्यकाळात त्यांनी मुंबई शहरासाठीच्या महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे राबवण्यात मोलाचे योगदान दिले होते.
त्यानंतर जुलै २०२३ ते जुलै २०२६ पर्यंत पालघर येथे कार्यरत राहिल्यानंतर, आता त्यांची बदली तिलारी आंतरराज्य प्रकल्पावर झाली आहे. चराठा येथील कार्यालयात योगेश पाटील यांनी विनायक जाधव यांच्याकडून रीतसर सूत्रे हाती घेतली. याप्रसंगी नवीन अभियंता पाटील यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.












