नांदिवसे-पिंपळी पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे; तोपर्यंत पर्यायी रस्त्याची दुरुस्ती व्हावी- मुराद अडरेकर

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुमारे १६ गावांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पिंपळी-नांदिवसे मार्गावरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी, व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्राशी संबंधित नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली व्हाव्यात. तोपर्यंत पर्यायी मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी खडपोली येथील ग्रामस्थ मुराद अडरेकर यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यानुसार पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला. मात्र, संबंधित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व बांधकाम विभागाकडून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया, समन्वय व नियोजन वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी आजही अनेक तांत्रिक बाबी अपूर्ण अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे संबंधित विभाग एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. सद्यस्थितीत पुलाचे काम पावसाळ्यानंतरच पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुलाच्या कामामुळे कामगार बांधवांना दररोज सुमारे १७ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे इंधन खर्च, वेळेचा अपव्यय तसेच प्रवासी भाड्यात सुमारे ₹५०० पर्यंत वाढ झाली आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी खडपोली ते पेढाबे एकेरी मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून पावसाळ्यात हा मार्ग खचण्याची दाट शक्यता आहे. खडपोली येथील पऱ्या जवळील पूल देखील खचलेल्या अवस्थेत असून त्याकडे निधीअभावी दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. तसेच प्रांत अधिकारी साहेबांनी रस्ता रुंदीकरणाबाबत दिलेल्या स्पष्ट सूचनांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रशासनिक आदेशांनाच हरताळ फासण्यात आल्याचे चित्र आहे. जर सदर पुलाचे काम तातडीने युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले नाही, तर येत्या पावसाळ्यात पर्यायी मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची शक्यता आहे. परिणामी कामगारांना उद्योग क्षेत्रात पोहोचणे अशक्य होईल, विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाऊ शकणार नाहीत तसेच औद्योगिक वसाहतीमधील जीवनावश्यक वस्तू, कच्चा माल व तयार मालाची वाहतूक विस्कळीत होऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कामकाज प्रभावित होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तरी याची तातडीने दखल घेऊन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, पर्यायी मार्गांची त्वरित दुरुस्ती करावी, धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय निर्माण करून नागरिकांना तात्काळ दिलासा द्यावा, असे या निवेदनात मुराद अडरेकर यांनी नमूद केले आहे.