दुरुस्तीच्या नावाखाली मुख्य प्रवेशद्वार २० दिवसांपासून कुलूपबंद; काम तर सुरूच नाही
नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त; रूग्णालय प्रशासन सुस्त
देवरूख (प्रतिनिधी):
सरकारी प्रशासनाचा निर्ढावलेपणा आणि रुग्णांच्या सुविधेशी चाललेला खेळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालयात दुरुस्तीचे कारण पुढे करत गेल्या २० दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वार चक्क बंद ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ‘दुरुस्ती’च्या नावाखाली दार तर बंद केले, पण गेल्या २० दिवसांत येथे साधे कामही सुरू झालेले नाही! प्रशासनाच्या या मनमानी आणि बेजबाबदार कारभारामुळे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हक्काच्या उपचारासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात नेमके कुठून प्रवेश करायचा, याच मोठा प्रश्न पडला आहे. मुख्य दरवाजा बंद केल्यानंतर प्रशासनाने साधी एक माहिती देणारी पाटी किंवा दिशादर्शक फलक लावण्याची तसदीही घेतलेली नाही. यामुळे रुग्णालयाच्या आवारात कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना घेऊन आलेले नातेवाईक “आत जायचं कुठून?” हे विचारत इकडून तिकडे चकरा मारत आहेत.
जर दुरुस्तीचे काम सुरूच करायचे नव्हते, तर मुख्य रस्ता बंद करून रुग्णांना वेठीस धरण्याचा अट्टाहास का केला गेला? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. आधीच आजारपणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना या सावळागोंधळामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाचे प्रशासन ढाराढूर झोपले आहे का, असाच प्रश्न यावरून निर्माण होतोय.
या गंभीर प्रकारामुळे देवरुख आणि परिसरातील जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढून रुग्णांसाठी योग्य आणि सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसेच तिथे स्पष्ट फलक लावावा. जर येत्या दोन दिवसांत हा गोंधळ थांबला नाही आणि रुग्णांची ही ससेहोलपट थांबली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा आक्रमक इशारा स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. आता तरी या सुस्त प्रशासनाला जाग येणार की एखाद्या रुग्णाचा जीव जाण्याची वाट पाहिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













