सावंतवाडीत उद्या भाजपचे ‘सेवा अभियान’

काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये समस्यांचे निवेदन स्वीकारणार

समस्या व विकासकामांबाबतची निवेदने घेऊन येण्याचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे आभार

​सावंतवाडी:
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘सेवा अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाचे आयोजन उद्या सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे करण्यात आले आहे. सावंतवाडी मतदारसंघातील नागरिकांनी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील समस्या व विकासकामांबाबतची निवेदने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावे तयार करून आणावीत, असे आवाहन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.

​या सेवा अभियानाचे संयोजक विधानपरिषद आमदार प्रमोद जठार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी श्री. साखरे हे प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडत आहे.

​समस्यांच्या निराकरणासाठी प्रदेश स्तरावर पाठपुरावा
​या अभियानांतर्गत प्राप्त होणाऱ्या निवेदनांवर भाजपच्या प्रदेश कार्यालयात गांभीर्याने विचार केला जाईल. गावे, वॉर्ड, प्रभाग आणि तालुक्यासाठी आवश्यक असणारा विकासनिधी उपलब्ध करून देणे, स्थानिक समस्या सोडवणे आणि विकासकामांना गती देणे यावर प्रदेशाध्यक्ष स्वतः मार्ग काढणार आहेत. भाजपच्या माध्यमातून सर्व प्रश्नांचे परिपूर्ण निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती ॲड. निरवडेकर यांनी दिली.

​पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पुढाकार
​या अभियानाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा पूर्ण पाठिंबा आणि सहभाग लाभला आहे. तसेच भाजप युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, उपसभापती गौरव मुळीक, नेमळेचे माजी सरपंच विनोद राऊळ, युवा मोर्चाचे हितेन नाईक आणि विनेश तावडे यांसह भाजपचे सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक व नगराध्यक्ष हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

​तरी मतदारसंघातील सर्व संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी आपापल्या भागातील योजना व अडचणींसंदर्भातील निवेदने लेखी स्वरूपात घेऊन सकाळी १० वाजता काझी शहाबुद्दीन हॉल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.