राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद

४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

राजापूर प्रतिनिधी : राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शेखरकुमार अहिरे यांचा शुक्रवारी २९ मे रोजी साठावा वाढदिवस आहे. त्यांची सुकन्या डॉ. सेलिना शेखरकुमार अहिरे यांनी आपल्या वडिलांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविला., “रक्तदान म्हणजे जीवनदान, वाढदिवसानिमित्त मिळो मानवतेचं मान” या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले होते.
राजापूर ग्रामीण रुग्णालयात गुरूवारी या शिबीराचा शुभारंभ राजापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक संजय ओगले व माजी उपाध्यक्ष व संचालक विजय पाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी शेखरकुमार अहिरे,. सौ. नेहा शेखरकुमार अहिरे, डॉ. सेलिना शेखरकुमार अहिरे, रोमा, हर्षा यांसह राजापूर अर्बन बँकेचे अधिकारी लक्ष्मण म्हात्रे यांसह कर्मचारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबीरात रक्तदानासाठी मोठया प्रमाणावर नोंदणी करण्यात आली होती. यातील चाचणीअंती पात्र ठरलेल्या ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीराला माजी आमदार राजन साळवी, जिल्हा बँक संचालक मंदार सप्रे, पंचायत समिती सदस्य राजेश गुरव यांसह अर्बन बँक संचालक राजेश कुशे, अनिलकुमार करंगुटकर, सौ. प्रतिभा रेडीज, राजापूर पत्रकार संघाचे अध्क्ष नरेंद्र मोहिते, सहसचिव प्रकाश नाचणेकर, राजापूरचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र बांवधनकर आदींसह राजापूर अर्बन बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या.
या रक्तदान शिबीर प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे तसेच रक्तदात्यांचे डॉ. सेलिना शेखरकुमार अहिरे यांनी स्वागत केले. यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सेलिना अहिरे म्हणाल्या, “वडिलांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तूंपेक्षा रक्तदानातून कुणाच्या तरी जीवनाला आधार मिळावा, हीच आमची भावना आहे. आपला एक थेंब रक्त एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. असेही त्यांनी सांगितले.
या रक्तदान शिबीराच्या आयोजनासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री, परिचारिका वैशाली मुळये, रत्नागिरी रक्तपेढीचे सागर चव्हाण, राजापूर रक्तपेढीचे राजेश गेल्ये व सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. या शिबीराचे अत्यंत नेटके असे नियोजन अहिरे यांच्या दोन्ही कन्यांनी केले होते.