कोकणचे अर्थकारण बदलणारे मार्केटयार्ड…!
माझे कोकण… संतोष वायंगणकर
मुंबईतील महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कणकवली-देवगड-वैभववाडी चे आ. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केटयार्ड नांदगाव या मध्यवर्ती आणि सोईच्या ठिकाणी व्हावे अशी मागणी राज्याचे पणनमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आली. पणनमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनीही आ. नितेश राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. उपसचिवांना मार्केटयार्डचा प्रस्ताव बनविण्याच्या सुचनाही दिल्या. सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच उभं रहाणार हे मार्केटयार्ड केवळ सिंधुदुर्गलाच उपयुक्त ठरेल असे नाही. तर रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांनाही याचा लाभ घेता येण्यासारखा आहे. कोकणात आंबा, काजू, कोकम, चिवाकाठी, जांभुळ, करवंद असं बरच काही आहे. परंतु यातल कशाचही मार्केट नीटपणाने बागायतदार शेतकरी यांना मिळतच नाही. बर गेल्या अनेक वर्षात कोट्यावधी रूपयांची उलाढाल असलेला आंबा आजही नवी मुंबईच्या फळ, फुले मार्केटमध्ये हातरूमालाच्या खालून बोटामध्ये त्याची किंमत होते. वाशी मार्केटमधील गेली अनेकवर्षे आंब्याची दलाली करणारा दलाल कोकणातील आंब्याचा दर ठरवत आला. आणि कोकणातील बागायतदार शेतकरीही दलाल ठरवेल तो दर आणि दलाल आंब्याची पाठवेल ती पट्टी याच पट्टीतून आंब्याची किंमत बागायतदाराला कळवली जाते. गेली अनेकवर्षे रूमालाआडचा हा आर्थिक व्यवहार सुरू आहे. संगणक आणि ऑनलाईनच्या जमान्यातही हा आर्थिक व्यवहार अशाच पद्धतीने होतो. काजू ‘बी’ ला शासनाने हमीभाव दिलेला नाही. यामुळे व्यापारी ठरवतील तो काजू ‘बी’ चा दर अशी स्थिती आहे. यातच आफ्रिकन काजू ‘बी’ मोठ्याप्रमाणावर मार्केटमध्ये येतो. यामुळे कोकणातील चविष्ट असणारा काजूगराला योग्य दर मिळत नाही. चिवाकाठीच्या बाबतीतही तिच स्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होऊ शकतो. ही संकल्पनाच कोकणात तरी ती म्हणावी तशी रूजलेली नाही. कोकणातील देवगड, वेंगुर्ले, मालवण, राजापूर, लांजा, रत्नागिरी भागात मोठ्याप्रमाणात आंबा उत्पादित होतो. कोट्यावधी रूपयांची आंब्याची उलाढालही होते. परंतु मार्केटयार्ड नसल्याने कोकणात उत्पादित होणाऱ्या फळांना योग्य मार्केट उपलब्ध नाही. राज्य सरकारच्या पुढाकाराने नांदगाव येथील नियोजित मार्केटयार्डमुळे कोकणातील फळ, मासे, चिवाकाठी अशा अनेक उत्पादित वस्तूंना निश्चितच चांगल मार्केट उपलब्ध होऊ शकेल. मध्यल्या कोरोना कालावधीत आंब्याच्याबाबतीत एक नवीन मार्केट मिळाल. कोकणातील आंबा बागायतदारांच्या बागेमध्ये येऊन अनेक व्यापारी आंबा खरेदी करू लागले. किंवा कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये शेतकरी पेटी आंबा खरेदीदाराच्या दारात नेऊन देऊ लागला. यामध्ये बागायतदार शेतकरी अधिकचे पैसे मिळवू लागला. हे सगळ जरी खर असल तरीही कोकणसाठी मार्केटयार्डची उभारणी करण्यात आली पाहिजे. फळ, मासे याला योग्य दर आणि योग्य पद्धतीने साठवणुक करण्यासाठी मार्केटयार्ड असलं पाहिजे. ती सिंधुदुर्गची कोकणची खरी गरज होती. सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजारसमिती स्थापन होऊन २३ वर्षे झाली. या २३ वर्षात कृषी उत्पन्न बाजारसमितीने प्रयत्न जरूर केलेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. मुळातच मार्केटयार्ड असत ही कल्पना कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांनी कधी मनाकडेच येऊ दिली नाही. मार्केटयार्डचे कोणते फायदे याचाही विचार केला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात याच मार्केटयार्डमुळे गुळाने जगभराच मार्केट प्राप्त केलं. नव्या तंत्रज्ञाने गुळ निर्मिती झाली. आणि मार्केटयार्डमुळे कोणत्याही वस्तूच, फळांच ग्रेडींग होऊ लागलं. त्याचा चांगला परिणाम झाला. वस्तूला आणि फळांना निर्यात करता येऊ लागल. दर्जा आणि गुणवत्ता द्यावीच लागते. दर्जा राखल्याशिवाय मार्केटमध्ये टिकाव लागूच शकत नाही. मार्केटयार्डमुळे सर्व फळबाजार एकाच छताखाली येईल. त्याची खरेदी-विक्री मार्केटयार्डमध्येच होईल. आ. नितेश राणे यांनी मार्केटयार्ड नांदगाव येथे उभारणीची मागणी करण्यामागे दूरदृष्टीकोन त्यामागे आहे. देवगड, मालवण, वेंगुर्ले, विजयदुर्ग या भागातून मासे, आंबा एक दिडतासात नांदगावच्या मार्केटयार्डमध्ये येऊ शकेल. नांदगाव रेल्वे स्टेशन आहे. खास बोगीतून फळ, मासे एक्सपोर्ट होऊ शकतात. मार्केटयार्डमध्ये मोठमोठाली शितगृह उभारणी होणार असल्याने निश्चितच शितगृहाचा वापर, फळ, मासे साठवणुकीसाठी करता येऊ शकेल. आज कठीण वाटणाऱ्या अनेक समस्या या एका मार्केटयार्डच्या निर्मितीने सुटतील. कोकणची अर्थव्यवस्था या मार्केटयार्डमुळे अधिक गतीमान होईल. बळकट होईल. यासाठी मार्केटयार्डच्या लवकरात-लवकर उभारणीसाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. आ. नितेश राणे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने काम करण्याच्या कार्यपद्धतीतील कोकणच्या विकासातील हे नव, पुढचं पाऊल असच म्हणावं लागेल.












