तुरळ परिसरात महामार्गाच्या साइडपट्ट्यांची दयनीय अवस्था

देवरूख (प्रतिनिधी):
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ परिसरात महामार्गाच्या साइडपट्ट्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साइडपट्ट्या धोकादायक बनल्या असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याशिवाय प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने नागरिकांना उन्हाळा व पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तुरळ परिसरात कडवई तसेच इतर गावांकडे ये-जा करण्यासाठी सुरक्षित उड्डाणपूल नसल्याने स्थानिकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींना आपला जीवही गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही मूलभूत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदन सादर केले असून संबंधित ठेकेदाराने तातडीने लक्ष देऊन आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. साइडपट्ट्यांची दुरुस्ती, पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था, प्रवाशांसाठी निवारा शेड तसेच सुरक्षित उड्डाणपूल उभारण्यात यावेत, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. महामार्गवर तुरळ याठिकाणी अशी धोकादायक स्थिती पहायला मिळत आहे.