ग्रामपंचायत कार्यालये व खासगी निवासस्थानी भरविलेल्या कॅम्पमध्ये अधिक रक्कम घेतल्याचा आरोप; नागरिकांकडून चौकशीची मागणी
देवरूख (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत संगमेश्वर तालुक्यात काही गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये तसेच काही ठिकाणी खासगी व्यक्तींच्या घरामध्ये स्मार्ट कार्ड नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यात असून . या कॅम्पमध्ये शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
शासनाने स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपये शुल्क निश्चित केलेले असताना, काही ठिकाणी नागरिकांकडून २५० रुपये तर काही ठिकाणी ३०० रुपये घेतल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्षात जादा रक्कम घेतली जात असतानाही पावती मात्र १९९ रुपयांचीच देण्यात आल्याचा दावा अनेक नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायत कार्यालये आणि खासगी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये अनेक नागरिकांनी स्मार्ट कार्ड काढले. शासनाच्या अधिकृत शुल्काची माहिती नसल्याने अनेकांनी मागितलेली रक्कम भरल्याचे सांगितले जात असून, आता हा प्रकार तालुकाभर चर्चेचा विषय ठरला आहे.
शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम नेमक्या कोणत्या कारणास्तव आकारण्यात आली, पावतीमध्ये केवळ १९९ रुपयांचाच उल्लेख का करण्यात आला आणि अतिरिक्त रक्कम कोणाच्या निर्देशानुसार घेण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने या कथित अनियमिततेची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, संबंधित एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करावी आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.













