राजापूर व संगमेश्वर पोलीसांची कर्नाटक मोहिम फत्ते

हॉटेल मधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या 
राजापूर प्रतिनिधी: राजापूर  व  संगमेश्वर येथील हॉटेल मधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील त्या चार संशयीत आरोपींच्या शोधासाठी कर्नाटकात गेलेल्या राजापूर व संगमेश्वर पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी अर्शद अहमद निसार अहमद पोकाकी (२५) रा. मुंडगोड, जि. उत्तर कन्नड, कर्नाटक याला पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या मोबाईल सीडीआर वरून पोलीसांनी त्याला हरपन्नहळ्ळी ता. एल्लपुण कर्नाटक येथून कर्नाटक पोलीसांच्या सहकार्याने जेरबंद केले आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील हॉटेल व लॉजिंग मधील नोंदणी रजिस्टर चोरून ती दुसऱ्या टोळीला विकण्याचे काम हे आरोपी करत असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. यांच्याकडील ही हॉटेल व लॉजिंग मधील नोंदणी रजिस्टर घेऊन त्यावर असलेल्या मोबाईलवर संपर्क करून त्यांना पैशासाठी ब्लॅकमेल करून खंडणी उकळणारी आणखी एक दुसरी मोठी टोळी कर्नाटकात कार्यरत असल्याचेही या तपासात पुढे आले आहे.
त्याला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला प्रारंभी २८ मे पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला पुन्हा गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ११ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी त्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वर पोलीसांनी न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. दरम्यान अन्य तीन आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत.
सोमवारी १८ मे रोजी राजापुरातील हॉटेल फुडलॅन्ड व संगमेश्वर मधील हॉटेल श्रध्दा येथील लॉजिंगचे नोंदणी रजिस्टर घेऊन पलायन करणाऱ्या त्या चार संशयीत आरोपींनी महामार्गावर तुरळे येथे गाडी सोडून पलायन केले होते. पोलीसांना या गाडीत सात मोबाईल व नऊ हॉटेल व लॉजिंगची नोंदणी रजिस्टर आढळून आली होती. दरम्यान हे चारही संशयीत आरोपी हे कर्नाटक येथील असल्याचे तपासात पुढे आले होते. यानंतर राजापूर पोलीसांकडून कर्नाटक पोलीसांशी संपर्क साधण्यात आला होता.
या प्रकरणी पोलीसांकडून कर्नाटक पोलीसांशी संपर्क साधल्यानंतर आता पोलीसांचे एक विशेष पथक कर्नाटक मध्ये गेले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशाने व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी प्रथमेश उकार्डे, श्री. लोखंडे यांचे हे पथक कर्नाटक येथे गेले होते.
स्थानिक पोलीसांच्या सहकार्याने या पथकाने अर्शद अहमद निसार अहमद पोकाकी याला सापळा रचून २६ मे रोजी रात्री तब्यात घेतले. त्याला २७ मे रोजी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपताच त्याला पुन्हा गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायने त्याची ११ जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान संगमेश्वर पोलीस स्थानकात देखील या आरोपींविरोधात गुन्हा दाखल असल्याने आता संगमेश्वर पोलीस या आरोपीला ताब्यात घेणार आहेत. तसा अर्ज त्यांनी न्यायालयाकडे केला आहे.
अवघ्या आठवडा भरातच या प्रकरणातील टोळीतील एका आरोपीला राजापूर व संगमेश्वर पोलीसांनी जेरबंद केल्याबद्दल पोलीसांचे कौतुक होते. यातील अन्य तीनही आरोपींचा पोलीस शोध घेत असून कर्नाटक पोलीसांच्या सहकार्यातुन या टोळीचा परदापाश करून ही टोळीच उध्दवस्त करण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे. या प्रकरणी राजापुरातील या गुन्हयाकामी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोबीन शेख तपास करत आहेत.
फसवणूक करणारी मोठी टोळी कर्नाटकात कार्यरत
अशा प्रकारे हॉटेल व लॉजिंगमध्ये आलेल्या ग्राहकांचे संपर्क क्रमांक शोधून त्यांना संपर्क साधून त्यांची फसवणूक करणारी मोठी टोळी कर्नाटकात कार्यरत असल्याचे या तपासात पुढे आले आहे. हॉटेल व लॉजिंग मधील नोंदणी रजिस्टर चोरणारे हे चोरटे कर्नाटक सोडुन महाराष्ट्र, गुजराथ, आंध्रप्रदेश यांसारख्या राज्यातील हॉटेल व लॉजिंग मधील नोंदणी रजिस्टर चोरून ती दुसऱ्या टोळीला विकतात. या दुसऱ्या टोळीकडून मग हॉटेल व लॉजिंग मधील नोंदणी रजिस्टरवर असलेल्या व्यक्तींच्या संपर्क क्रमांकावर कॉल करून आपण अमुक हॉटेलमध्ये भेटला होतो, तुम्ही राहिला होतात, एकत्र चहा प्यालयो असे सांगून ओळख सांगितली जाते, त्यानंतर मग आमच्याकडे कमी किमतीत सोने उपलब्ध आहे असे सांगून त्यांना भुरळ घातली जाते व जाळयात अडकवून मग त्यांना सोने वा अन्य खोटया व्यवहारात ओढून त्यांची फसवणूक केली जाते. कर्नाटक राज्यात काही विशिष्ट गावांमध्ये हे प्रकारे सुरू असल्याचीही माहिती पुढे आली आहे.