कोंडगे धरणग्रस्तांचा मोबदला वाटप स्थगित करण्यात यावा

 

कोंडगे गावचे माजी पोलीस पाटील गंगाधर कोंडगेकर यांची यांची मागणी

उपविभागीय अधिकारी राजापूर यांना निवेदन सादर

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोंडगे येथील लघु पाटबंधारे योजनेच्या बुडीत क्षेत्र सांडवा प्रकल्प आणि पुच्छ कालव्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या प्रकरणात लाखोंचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे आपल्या विभागामार्फत करण्यात आलेल्या धरणग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला वाटप स्थगित करण्यात यावा, अशी मागणी येथील धरणग्रस्त ग्रामस्थ आणि माजी पोलीस पाटील गंगाधर कोंडगेकर यांनी उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोंडगे येथील लघुपाटबंधारे धरण प्रकरणात लाखोंचा भ्रष्टाचार झालाय आणि त्यामुळेच आपल्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणग्रस्तांची मोबदला वाटप संविभाजन यादी पाहता यात बरीच तफावत दिसून येत आहे. आणि त्यामुळेच या विषयांच्या अनुषंगाने जर कोणा शेतकऱ्याचे मोबदला वाटप करण्यात आले असेल तर ते स्थगित करण्यात यावे. सर्व धरणग्रस्तांचा मोबदला ला वाटप रक्कम थांबवण्यात यावी. संबंधित रक्कम ही कार्यालयात भरणा करून घ्यावी अशी मागणी गंगाधर कोंडगेकर यांनी केली आहे.

याबाबत गंगाधर कोंडगेकर यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी जी धरणग्रस्त संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती तिचा अध्यक्ष म्हणून पाटबंधारे विभागात काम करणारा सेवानिवृत्त कर्मचारी होता. या संघर्ष समितीने कधीही आजवर येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना विचारत घेतले नाही. त्यांच्याशी कधीही या संदर्भात चर्चा केलेली नाही किंवा त्या संदर्भात मिटींगही घेतलेली नाही. तसेच या धरण प्रकरणातएका धरणग्रस्त शेतकऱ्याला १०० गुंठे जागेसाठी ७० लाख ५० हजार ३६७ इतकी रक्कम मंजूर आली आहे. मात्र आपल्या ६३ गुंठ्यासाठी अवघी ४ लाख ६८ हजार ९२८ रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अशाप्रकारे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या भूसंपादन मोबदल्यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार आहे.आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि तोपर्यंत एकाही धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येऊ नये. आणि याबाबत सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास आपण ग्रामस्थांसह प्राणांतिक उपोषण प्रांत अधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत. तसेच याबाबत पालक मंत्र्यांना देखील निवेदन सादर करणार असल्याचे माजी पोलीस पाटील गंगाधर कोंडगेकर यांनी सांगितले.