आंदोलनाचा दिला ईशारा.
दापोली(प्रतिनिधी):
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पर्यटन व्यवसाय, हॉटेल व्यावसायिक तसेच नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दापोली पर्यटन विकास मंच यांनी महावितरण कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मंचच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, दापोली यांना निवेदन देण्यात आले असून, वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः मे महिन्यात पर्यटन हंगाम सुरू असताना सततचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) नियमांचा उल्लेख करत ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित राहण्याच्या मर्यादांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अनेक भागांमध्ये लो व्होल्टेज, ट्रिपिंग आणि अचानक वीज बंद होण्याच्या समस्येमुळे पर्यटक नाराज होत असून दापोलीच्या पर्यटन प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे म्हटले आहे.
व्यवसायिकांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये दापोली पर्यटन पट्ट्यासाठी स्वतंत्र “डेडिकेटेड एक्सप्रेस फीडर” सुरू करणे, वीज खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती करणे, SOP 2021 नुसार ग्राहकांना नुकसानभरपाई देणे आणि वारंवार खंडित होणाऱ्या भागांतील दोष तातडीने दूर करणे या मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, येत्या सोमवारी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि दापोली पर्यटन विकास मंच चे पदाधिकारी आणि सर्व हॉटेल व्यावसायिक यांच्यात भेट घडवून आणणार असल्याची माहिती महावितरण च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान विजेच्या खेळखंडोबामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी दापोली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा गंभीर इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे. महावितरण च्या कारभारात अपेक्षित सुधारणा झाल्या नाहीत आणि निवेदनात उल्लेख केलेल्या मागण्यांची पूर्तता केली गेली नाही तर, यापुढे महावितरण विरोधात छेडल्या जाणाऱ्या तीव्र आंदोलनात स्थानिक पर्यटन व्यावसायिक, हॉटेल चालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.











