शिक्षक भारतीच्यावतीने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजलक्ष्मी राणे यांचा सन्मान

सावंतवाडी । प्रतिनिधी : शिक्षक भारती सावंतवाडीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी दरवर्षी नारीशक्तीचा सन्मान केला जातो. या पार्श्वभूमीवर यावर्षीही स्री शक्तीच्या या महत्त्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधत सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजलक्ष्मी राणे यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती राणे यांनी चाळीस वर्षे पोलीस दलातील दमदार व तडफदार सेवेबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा एक वेगळाच ठसा उमटवत दिलेल्या सेवेसाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडीच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. श्रीमती राज्यलक्ष्मी राणे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना येणाऱ्या असंख्य अडचणींवर मात करीत पोलीस सेवेत एक मार्च १९८३ रोजी रुजू झाल्यापासून सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी परिश्रमपूर्वक कार्य केले.

आपला दरारा आणि आपली सचोटी यांच्या बळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी केलेले अथक प्रयत्न सदैव सर्वांच्या स्मरणात रहाणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपल्या सेवेची मोहर उमटवत त्यांनी दिलेल्या सेवेसाठी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या महिला आघाडी प्रमुख सौ. सुस्मिता चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा शिक्षक भारती उपाध्यक्ष अनंत सावंत, संघटक संतोष वैज, सावंतवाडी शिक्षक भारती अध्यक्षा अनिता सडवेलकर – गावडे , सचिव अरविंद मेस्त्री , उपाध्यक्ष राजाराम पवार कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, अभिषेक राणे आदी उपस्थित होते.