खेड (प्रतिनिधी) : कोकण आयुर्वेद या वैद्यकीय संस्थेचे संस्थापक तथा आयुर्वेद अभ्यासक सुर्यकांत नलवडे यांना विना मोबदला नाडी परीक्षण सेवा देत समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘आयुष ग्लोबल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेड शहरातील अथर्व हाईट येथील कोकण आयुर्वेद केंद्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन केले.
गेल्या अनेक वर्षांपासून सुर्यकांत नलवडे हे नाडी परीक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आहेत. कोणताही मोबदला न घेता समाजातील गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना ‘आयुष ग्लोबल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी उद्योजक प्रवीण छपरे यांच्यासह खेडमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नलवडे यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि आरोग्यसेवेतील योगदानाची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सुर्यकांत नलवडे यांनी हा सन्मान समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादामुळे मिळाल्याची भावना व्यक्त केली. तसेच दि. ३१ मे रोजी सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे वाग्देव महाराज यांच्या चरणी हा पुरस्कार अर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.












